पुणे : पुरंदर विमानतळाच्या उड्डाणात व्यत्यय ; बाधित ग्रामपंचायतींचा न्यायालयात जाण्याचा इशारा , निवडणुकांवर बहिष्काराचा ठराव

पुणे : पुरंदर येथील पुण्याच्या प्रस्तावित आंतरारष्ट्रीय विमानतळाबाबत शिंदे – फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे प्रकल्प प्रस्तावित केलेल्या पुरंदमधील सातही गावांमधील काही नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह इतर निवडणुकांत मतदानावर बहिष्कार टाकण्यात येत असल्याचा ठराव ग्रामपंचायतींनी केला आहे. तसेच वेळप्रसंगी प्रकल्पाविरोधात न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही दिला आहे.

पुण्याचे हक्काचे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर येथे प्रस्तावित करण्यात आले आहे. या विमानतळासाठी सुमारे तीन हजार हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. त्यामध्ये पारगाव, मेमाणे, खानवडी, एखतपूर, मुंजवडी, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाचीवाडी या सात गावांतील जमिनी संपादित करण्यात येणार आहेत. महाविकास आघाडी सरकार पायउतार होऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर विमानतळासंदर्भात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून (महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी – एमएडीसी) आतापर्यंत करण्यात आलेल्या कामाचे विस्तृत अहवाल, कागदपत्रे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमआयडीसी) देण्यात आली आहेत. एमआयडीसी कायद्यानुसार भूसंपादन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर या सात गावांमधील ग्रामपंचायतींनी प्रकल्पाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

दरम्यान, विमानतळ प्रकल्पामुळे पुरंदमधील सात गावे पूर्णतः बाधित होत आहेत. त्यामुळे सोमवारी या गावातील ग्रामपंचायत सदस्यांनी बैठक घेऊन विमानतळाला एकमताने विरोध दर्शविला आहे. तसेच वेळ पडल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा देण्यात आला असून दिवाळीत घरावर काळे झेंडे लावण्यात येणार असल्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. या वेळी स्थानिक आमदार संजय जगताप, जिल्हा परिषदेचे सदस्य, पदाधिकारी, स्थानिक नागरिक उपस्थित होते. जगताप यांनी स्थानिकांच्या मागे उभे राहणार असल्याचे स्पष्ट करत पुरंदर विमानतळाला विरोध असल्याचे जाहीर केले आहे.

प्रस्तावित पुरंदर विमानतळामध्ये आमच्या जमिनी संपादित करण्यात येणार असल्याचे केवळ माध्यमांमधून ऐकत आहोत. सरकारी पातळीवर आमची दखल घेतली जात नसून आमचा जमिनी देण्यास विरोध आहे. भविष्यात हा विरोध तीव्र करण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया लढण्यासाठी तयार आहोत. यंदाच्या दिवाळीमध्ये घरांवर काळे झेंडे लावून निषेध व्यक्त करणार असल्याचा ठराव मांडण्यात आला असून त्याला एकमुखाने पाठिंबा देण्यात आला आहे.– संतोष कुंभारकर, सरपंच, उदाचीवाडी ग्रामपंचायत

स्थानिकांची मान्यता नसताना सरकार बळजबरी करू शकत नाही. आमच्या उदरनिर्वाहावर लाथ मारणार असल्यास त्यास तीव्र विरोध आहे. इंचभरही जमीन सरकारला देणार ऩाही. ग्रामपंचायत स्तरावर प्रस्ताव करण्यात आला आहे, तर पुरंदर विमानतळ विरोध संघर्ष समितीची तीन दिवसांनी पुन्हा बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल.– स्वप्नाली होले, सरपंच, खानवडी ग्रामपंचायत



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply