पुणे : दोन दिवसांनंतर गारव्यात आणखी वाढीची शक्यता ; विदर्भात पावसाळी स्थिती

पुणे : उत्तरेकडील काही राज्यांत सध्या थंडीची लाट आहे. त्याचबरोबरीने मध्य प्रदेशापासून विदर्भापर्यंत कमी दाबाच्या पट्टा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून विदर्भात पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, पुढील दोन दिवसांनंतर राज्यातील तापमानात आणखी घट होऊन गारवा वाढणार असल्याचा अंदाज आहे.

राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली ते मध्य प्रदेशपर्यंत काही भागांत गेल्या आठवड्यापासून थंडीच्या लाटेची स्थिती आहे. त्याचप्रमाणे काही भागांत तीव्र धुके पडते आहे. या भागातून महाराष्ट्राकडे थंड वाऱ्यांचे प्रवाह येत असले, तरी त्यास कमी दाबाच्या क्षेत्रांचा अडथळा आहे. सध्या गुजरातकडून किनारपट्टीच्या भागामध्ये थंड वाऱ्यांचे प्रवाह येत आहेत. त्यामुळे मुंबईसह किनारपट्टीच्या भागात काहीसा गारवा आहे. उत्तर महाराष्ट्रातही रात्रीचे तापमान सरासरीजवळ असल्याने या भागात गारवा आहे. मात्र, पावसाळी वातावरणामुळे विदर्भातील बहुतांश भागातील रात्रीचे तापमान वाढून थंडी कमी झाली आहे. दिवसाच्या कमाल तापमानात मात्र कमालीची घट होऊन उन्हाचा चटका गायब झाला आहे. विदर्भासह, मराठवाड्याच्या काही भागांत गुरुवारीही (५ डिसेंबर) पावसाळी स्थिती राहणार आहे. त्यामुळे त्याचा थंडीवर परिणाम होणार आहे. मात्र, दोन दिवसांनंतर पावसाळी वातावरण दूर होऊन रात्रीच्या किमान तापमानात घट होईल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात २ ते ४ अंशांनी तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढू शकेल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply