पुणे : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बीआरटी मार्ग विकसित करणार; ७४ कोटींच्या खर्चाला मान्यता

पुणे : जुन्या पुणे-मुंबई रस्त्याच्या रुंदीकरणानंतर बीआरटी मार्ग विकसित करण्यात येणार असून त्यासाठी ७४ कोटी ७५ लाख रुपयांच्या खर्चाला महापालिका प्रशासनाने मान्यता दिली आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला जोडणारा जुना पुणे-मुंबई महामार्ग सर्वाधिक वाहतूक असलेला रस्ता आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सहा वर्षे रखडले होते. त्यामुळे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडीला वाहनचालकांना सामोरे जावे लागत होते.

रस्ता रुंदीकरणासाठी संरक्षण विभागाने २.१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी जागा देण्याची तयारी दर्शविली होती. अंडी उबवणी केंद्रापासून हॅरीस पुलापर्यंत ४२ मीटर रुंदीचा रस्ता केला जाणार आहे. सध्या हा रस्ता २१ मीटर रुंदीचा आहे. संरक्षण विभागाने महापालिकेला जागा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर मार्गावरील काही ठिकाणी खासगी जागा मालकांकडून जमिनींचे संपादन करण्यात आले आहे.

त्यामुळे रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर या मार्गावर बीआरटी मार्ग सुरू करण्यात येणार आहे. बीआरटी मार्ग सुरू करण्याचा आणि त्याच्या खर्चाचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समितीला देण्यात आला होता. त्याला प्रशासक विक्रम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समिती बैठकीत मंजुरी देण्यात आली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply