पुणे :जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ महिलेवर चाकुने वार करुन लुटले; शहरात चोरट्यांचा धुमाकूळ

पुणे : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पादचारी महिलेवर चाकुने वार करुन चोरट्यांनी तिच्याकडील रोकड तसेच मोबाइल असलेली पिशवी हिसकावून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी एका चोरट्यास अटक करण्यात आली.

या प्रकरणी रोहिदास साईदास चव्हाण (वय ३५, रा. वडारवाडी) याला अटक करण्यात आली. चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात एक महिला जखमी झाली आहे. याबाबत येरवडा भागातील एका महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरातून जात होती. त्या वेळी चव्हाणने तिला अडवले आणि तिच्यावर चाकुने वार केला. तिच्याकडील रोकड आणि मोबाइल संच असा बारा हजारांचा मुद्देमाल असलेली पिशवी हिसकावून चव्हाण पसार झाला. महिलेने आरडाओरडा केला. नागरिकांनी पाठलाग करुन चव्हाणला पकडले. चव्हाणला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव तपास करत आहेत.

दरम्यान, हडपसर भागात सकाळी एका पादचाऱ्याचा मोबाइल संच दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत हनुमंत जाधव (वय ३०, रा. हांडेवाडी रस्ता) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे तपास करत आहेत.

कोंढवा भागात चाकुच्या धाकाने चोरट्याने त्याच्याकडील दुचाकी लांबविल्याची घटना घडली. याबाबत अल्पेश शहा (वय ३०, रा. कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दुचाकीस्वार शहा कोंढवा भागातील पासलकर चौकातून रात्री दहाच्या सुमारास जात होते. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी त्यांना चाकुचा धाक दाखविला. त्यांच्याकडे पैसे मागितले. शहा यांनी पैसे नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्याकडील दुचाकी घेऊन चोरटे पसार झाले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply