पुणे : चौतीस गावांसह स्वतंत्र महानगरपालिकेसाठी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

हडपसर - पुणे महापालिकेत समाविष्ट चौतीस गावांसह पूर्व हवेलीची स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्याबाबत निवेदन दिले आहे. आमदार राहुल कुल यावेळी उपस्थित होते.

हडपसर, महंमदवाडी, खराडी, वडगावशेरी, खडकवासला, सिंहगड रोड यांसह पुर्व हवेलीतील गावांची स्वतंत्र महापालिका करण्याची मागणी गेली अनेक वर्षापासून होत आहे. फुरसुंगी व उरूळी देवाची या गावांच्या नगरपालिकेच्या निर्णयाने स्वतंत्र महानगरपालिकेच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शेवाळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्याबाबतची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली असल्याचे शेवाळे यांनी सांगितले.

नुकतीच राज्यसरकारने फुरसुंगी व उरुळी देवाची ही दोन गावे महापालिकेतून वगळली असून या गावांची नगरपालिका करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. यापूर्वी ऑक्टोंबर २०१७ ला अकरा गावांचा व जून २०२१ ला उर्वरित तेवीस गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. मात्र गावांत नागरी सुविधा पुरविण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. त्याच गावांमधून अवाजवी कर आकारून करोडो रुपये गोळा करण्यात आले आहेत. त्यामुळे सातत्याने या गावातील नागरिकांची महापालिके सोबत संघर्षाची भूमिका राहिलीआहे. प्रचंड नाराजीही पाहायला मिळत आहे.

१९९७ मध्ये पुणे महापालिकेत छत्तीस गावे समाविष्ट करण्यात आली होती. त्यावेळीही यातील काही गावे पुन्हा वगळली गेली. पुन्हा चौतीस गावांचा समावेश करण्यात आला. आता नुकतीच दोन गावे वगळली असून या दोन गावांना नगरपालिकेचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे. सध्या इतरही गावांमध्येही वातावरण तापले असून आमच्याही गावांचा समावेश नगरपालिकेत किंवा नवीन महानगरपालिकेत करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी काही गावातून ग्रामसभा आयोजित करण्यात येत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply