पुणे : गणेश विसर्जनासाठी महापालिकेची तयारी पूर्ण

पुणे : गणेश विसर्जनासाठी महापालिकेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरातील मध्यभागातील मिरवणूक मार्गांसह विविध भागांत सार्वजनिक स्वच्छता, औषधोपचाराची व्यवस्था, निर्माल्य कलश, विसर्जन हौद, फिरती स्वच्छतागृहे आदी तयारी पूर्ण करण्यात आली आहे.गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे विसर्जन मिरवणूक काढण्यात आली नव्हती. त्यामुळे यंदा गणेशोत्सव उत्साहात साजरा होऊन गणेशाला निरोप देण्याचे वेध लागले आहेत. महापालिकेच्या घनकचरा विभागाने मिरवणूक संपताच पुढच्या तीन-चार तासात शहर स्वच्छ करण्यासाठी यंत्रणा उभी केली  आहे. तसेच विसर्जनाच्या काळात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी नदीकाठी अग्निशामक दलाची यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. डेक्कन जिमखाना, पुणे व नुतन मराठी विद्यालयाजवळ, लक्ष्मी रस्ता या ठिकाणी मिरवणूक संपेपर्यंत वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे.

विसर्जन मिरवणुकीत शहरात खाद्यपदार्थ विक्री, खेळण्यांसह इतर साहित्य विक्रीचे स्टॉल लागलेले असतात. त्यामुळे मध्यभागातील सर्वच रस्त्यांवर कचरा पडलेला असतो. महापालिकेने मध्यवर्ती भागासाठी १३०० कर्मचारी, आदर पूनावाला फाउंडेशन, जनवाणी यासह इतर संस्था स्वच्छतेच्या कामामध्ये असणार आहेत. याच भागात २१० फिरती स्वच्छतागृहे असणार आहेत. ७७०० स्वच्छता कर्मचारी तैनात असणार असून ज्या भागातील गणेश विसर्जन मिरवणूक जसजशी पुढे जाईल तसे लगेच स्वच्छतेचे काम सुरू होणार आहे.

अग्निशामक दलाचे २०० कर्मचारी
विसर्जन करताना नदीपात्राशेजारील घाटावर दुर्घटना घडू नये यासाठी १५० जीवरक्षक, १५ अधिकारी, २० जवान यासह २०० कर्मचारी १५ घाटांवर नियुक्त आहेत. मुसळधार पाऊस पडून नदीला पूर आल्यास व दुर्घटना घडल्यास लगेच मदतकार्य करण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळात प्रत्येक घाटावर सुरक्षेसाठी दोरी बांधलेली आहे, तसेच नदीमध्ये डेक्कन व पेठांच्या परिसरात तीन चार ठिकाणी दोर बांधली आहे. होडी, ट्यूबही ठेवण्यात आल्या आहेत.

प्रशासकांच्या हस्ते मिरवणुकीची सुरुवात नको

गणेश विसर्जन मिरवणूक या वर्षी पुण्याचे प्रथम नागरिक, महापौर यांच्या अनुपस्थित होते. दरवर्षी महापौरांच्या हस्ते मिरवणुकीची सुरुवात कसबा गणपतीच्या श्री गणेशाची आरती करून सुरू होते. मात्र महापालिकेवर प्रशासक असल्याने प्रशासक तथा आयुक्त विक्रमकुमार यांच्या हस्ते आरती करण्यात येणार आहे. मात्र माजी महापौर अंकुश काकडे यांनी वेगळा पर्याय सुचवला आहे. महापौर नसल्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोरे, खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते श्री गणेशाला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीची सुरुवात करण्यात यावी, अशी सूचना काकडे यांनी केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply