पुणे: कुमठेकर रस्त्यावर दुचाकी लावण्यावरून वाद; टोळक्याकडून वस्त्रदालनात तोडफोड

पुणे : कुमठेकर रस्त्यावरील एका वस्त्रदालनासमाेर दुचाकी लावण्याच्या वादातून टोळक्याने दुकानदाराला बेदम मारहाण करुन दहशत माजविल्याची घटना घडली. टोळक्याने दुकानातील आरशाची तोडफोड केली. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी एकास अटक केली असून साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अमित राजेंद्र कंधारे (वय २५, रा. ६५७, सदाशिव पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कंधारे याच्याबरोबर असलेल्या चार ते पाच साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंद सुरेश त्रिमल (वय ३७, रा. सुखसागरनगर, कात्रज) यांनी या संदर्भात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कुमठेकर रस्त्यावरील तेजस्विनी सिल्क सेंटर या वस्त्रदालनासमोर कंधारेने दुचाकी लावली होती. दुचाकी लावण्यावरुन वाद झाला. त्यानंतर कंधारे आणि साथीदारांनी त्रिमल यांना बॅट; तसेच स्टीलच्या पाईपने मारहाण केली. टोळक्याने त्रिमल यांच्या भावाला मारहाण केली. पोलिसाकडे तक्रार केल्यास बघतो, अशी धमकी देऊन कंधारे आणि साथीदारांनी दुकानातील आरसा आणि कठड्याची तोडफोड केली. सहायक पोलीस निरीक्षक संजय निकुंभ तपास करत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *