पुणे : कुख्यात गुंड गजा मारणेला न्यायालयीन कोठडी

पुणे : शेअर दलालाचे अपहरण करून त्यांच्या कुटुंबीयांकडे २० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी अटक करण्यात आलेला गुंड गजा मारणे याच्यासह दोघांना मोक्का न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने एकत्रित तपास करण्यासाठी पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी याबाबत आदेश दिला.

गजा ऊर्फ गजानन पंढरीनाथ मारणे (रा.शास्त्रीनगर,कोथरूड) आणि मयूर जगदीश जगदाळे (वय ३१, रा. होळकरनगर, आंबेगाव पठार) असे न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या आरोपींची नावे आहे. पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने मारणेला १६ ऑक्टोंबर रोजी साताऱ्यातील वाई परिसरातून ताब्यात घेतले होते. या गुन्ह्याच्या तपासासाठी न्यायालयाने त्याला २८ ऑक्टोबरपर्यंत मोक्का कोठडी सुनावली होती.

या गुन्ह्यात गज्या मारणेसह सचिन ऊर्फ पप्पू दत्तात्रेय घोलप (रा. गोविंदराव पाटील नगर, धनकवडी), हेमंत ऊर्फ बालाजी पाटील (रा. बुरली,पलुस, सांगली), फिरोज महंमद शेख (रा. समर्थनगर, कोडोवली, सातारा), सराईत गुन्हेगार डॉ. प्रकाश साताप्पा बांदिवडेकर (वय ५६, रा. कोल्हापूर), अजय बबन गोळे (वय २८), मयूर राजेंद्र निवंगुणे (वय २४, दोघेही रा. नऱ्हे) आणि प्रसाद बापू खंडाळे (वय २९, पद्मावती) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी ३८ वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. आरोपींच्यावतीने ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तिवाद केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply