पुणे: ऐन दिवाळीत चक्रीवादळ, पण महाराष्ट्राला धोका नाही; पावसाळी हंगामातील देशातील पहिलेच चक्रीवादळ

 

पुणे: ऐन दिवाळीच्या कालावधीत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याचे संकेत आहेत. मात्र, त्याचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नसून, राज्यात या काळात बहुतांश भागात कोरड्या हवामानाची स्थिती राहणार आहे. यंदाच्या पावसाळी हंगामात देशातील हे पहिले चक्रीवादळ असून, त्याचा फटका पश्चिम बंगाल आणि ओडिसाच्या किनारपट्टीला बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील पावसाळी स्थिती सध्या निवळत असून, मोसमी वाऱ्यांच्या परतीच्या प्रवासाला वेग मिळत आहे.

अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये गेल्या आठवड्यापासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस होतो आहे. पश्चिम महाराष्ट्रात सध्या पावसाचे प्रमाण अधिक आहे. मात्र, येत्या दोन दिवसांत राज्याच्या विविध भागामध्ये पावसाळी स्थिती दूर होऊन कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण होणार आहे. पुढील एक-दोन दिवस कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांत काही भागांतच पावसाची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात अंदमान समुद्रात आणि परिसरामध्ये सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. २२-२३ ऑक्टोबरला त्याचे अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता आहे. २४ ऑक्टोबरला पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. हे चक्रीवादळ २५ ऑक्टोबरला पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीच्या दिशेने जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भारतात पश्चिम बंगाल आणि काही प्रमाणात ओडिसाच्या किनारपट्टीला या चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.

मोसमी वाऱ्यांच्या परतीला बिलंब

महाराष्ट्रातून सध्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू आहे. १४ ऑक्टोबरला राज्यातून हा प्रवास सुरू झाला असला, तरी आठवड्यापासून अरबी समुद्रातून येणारे बाष्प आणि त्यातून होणाऱ्या पावसामुळे या प्रवासाला विलंब होतो आहे. परतीच्या प्रवासाच्या सर्वसाधारण नियोजित तारखांनुसार संपूर्ण देशातून १५ ऑक्टोबर, तर महाराष्ट्रातून १३ ऑक्टोबरपर्यंत परतीचा प्रवास पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, सध्या त्यास पाच दिवसांचा विलंब झाला आहे. सध्या परतीच्या प्रवासाने पुन्हा वेग घेतला असून, गुरुवारी विदर्भाच्या काही भागांतून मोसमी वारे माघारी फिरले. पुढील दोन दिवसांत राज्याच्या बहुतांश भागातून मोसमी वारे माघारी जातील.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply