‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहंनी बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करावी’; पुण्यातील कुस्तीगीराची मागणी

पुणे : राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धांमध्ये पदकांची कमाई करणारी महिला पहिलवान अंशू मलिकने भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या आरोपामुळे राजकीय आणि क्रिडा क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.  बृजभूषण यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत दोन दिवसांपासून कुस्तीगिरांचे आंदोलन सुरू आहे. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कुस्तीगिरांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी बृजभूषण सिंह यांना अध्यक्षपदावरून हटवून कारवाई करावी अशी मागणी केली आहे. याबाबत पुणे उपजिल्हाधिकाऱ्यांना पत्रही देण्यात आले आहे.

विजयराव जाधव (गुलशे तालीम),गोरखनाथ भिकुले (हमाल तालीम), विकास रानवडे (औंध गाव तालीम), पै.राहुल वांजळे (मामासाहेब मोहळ व्यायाम विकास मंडळ),केदार कदम,दीपक बनकर (बनकर तालीम) या सर्वांनी मागणी केली आहे.

भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष बृजभूषण सिंह हे जेव्हा स्पर्धा असताना शिबीरांमध्ये येतात तेव्हा प्रत्येक महिला पहिलवानाशी असभ्य वर्तन करतात. ज्युनिअर विश्व चँपियनशिप असताना बृजभूषण सिंह हे या मुलींसोबत एकाच मजल्यावर राहिले होते. ते आपल्या रूमचा दरवाजा उघडा ठेवत असत आणि मुलींना संकोच वाटेल असं वर्तन करत असत. त्यांना कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात यावं अशी मागणी आम्ही करतो आहोत असंही अंशूने म्हटलं आहे. मलाच नाही तर इतर अनेक मुलींनाही बृजभूषण सिंह यांनी त्रास दिला आहे. त्यांना संकोच वाटेल असं वर्तन त्यांनी अनेकदा केलं आहे असंही अंशू मलिकने म्हटलं आहे. आता कुस्तीच्या आखाड्यात सुरू झालेली ही आरोपांची दंगल कुठल्या दिशेने जाणार हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं असणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply