नरेंद्र मोदी गुजरातचे गौरव पुरुष, ऐतिहासिक विजयाचं श्रेय फक्त मोदींचं; ‘सामना’तून शिवसेनेची स्तुतीसुमनं

गुजरात तर मोदींचेच होते, पण दिल्ली जिंकणे ही खरी कसोटी होती. तसेच हिमाचल प्रदेशचे म्हणावे लागेल. हिमाचल प्रदेशात भाजपाची सत्ता होती. तेथे आता काँग्रेसने विधानसभेत पूर्ण बहुमत मिळवले आहे. हिमाचलमध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळाले, पण त्यांचे आमदार फोडून सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत भाजपा असेल तर ते अनैतिक आहे. अर्थात भाजपच्या राजकारणात सत्ता हेच सत्य असल्याने नैतिक व अनैतिकता वगैरे शब्द निरर्थक आहेत अशी टीका शिवसेनेने सामना संपादकीयमधून केली आहे. एकंदरीत गुजरात विजयाने भाजप जल्लोष करीत आहे. ते यश सर्वश्री मोदी यांचे आहे, पण दिल्ली व हिमाचल प्रदेश भाजपने गमावले त्यावर कोणीच बोलत नाही. असे का? असा प्रश्नही शिवसेनेने विचारला आहे.

“देशात तीन महत्त्वाच्या निवडणुका झाल्या व निकाल लागून विजयाचे उत्सव पार पडले. गुजरात विधानसभा निवडणुकांचे काय निकाल लागणार, यावर अजिबात चर्चा करण्याची गरज नव्हती. तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचंड विजय झाला आहे. ‘‘आजचा गुजरात मी बनवला आहे, हे गुजरात माझे आहे,’’ असा प्रचार पंतप्रधान मोदी यांनी केला व गुजराती जनतेने त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. मोदी हे गुजरातचे पंधरा वर्षे मुख्यमंत्री होते व या काळात गुजरातने प्रगती केली. पंतप्रधान म्हणूनही मोदी यांनी गुजरातकडे विशेष लक्ष दिले. त्यामुळे गुजरातमधील ऐतिहासिक विजयाचे श्रेय फक्त मोदी यांनाच द्यायला हवे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

“गुजराती मनावर मोदीची मोहिनी आहे व मोदी हीच गुजरातची अस्मिता आहे. काँग्रेस पक्षाची गुजरातमध्ये वाताहत झाली. काँग्रेस किमान पन्नास जागांपर्यंत पोहोचेल व पराभवातही प्रतिष्ठा ठेवेल अशी अनेकांची भाबडी आशा होती. काँग्रेस 20 जागांचा टप्पाही पार करू शकली नाही. १९८५ च्या निवडणुकीत गुजरातमध्ये माधवसिंग सोळंकी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने १४९ जागा जिंकल्या होत्या. हा विक्रम आतापर्यंत कायम होता. यावेळी ‘१४९’ चा आकडा पार करू असे भाजपचे प्रमुख नेते सांगत होते. तसा आकडा पार करून भाजपने नवा विक्रम निर्माण केला. भाजपच्या गणित तज्ञांचेही कौतुक करावेच लागेल. ते एक आकडा देतात व तसाच आकडा निकालातून बाहेर येतो. हा मोठाच चमत्कार म्हणावा लागेल,” असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

“गुजरातमध्ये भाजपच जिंकेल याविषयी कोणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नव्हते. करोना काळात गुजरातमध्ये सर्वात जास्त हाहाकार माजला. इस्पितळांत जागा नव्हती. स्मशानात आप्तांचे मृतदेह घेऊन रांगा लागल्या होत्या. तरीही लोकांनी मोदींच्या पारडय़ात मते टाकली. हे त्यांच्या नियोजनबद्ध निवडणूक यंत्रणेमुळे व पंतप्रधान असले तरी आपल्या गृहराज्याकडे बारीक लक्ष असल्यानेच घडले,” असं शिवसेनेने सांगितलं आहे.

“निवडणुकीपूर्वी मोरबी पूल दुर्घटना घडली. दुःखाची लाट उसळली. पण त्या लाटेचा तडाखा मोदी लाटेस बसला नाही. कारण मोदी हे गुजरातचे गौरव पुरुष आहेत. भूपेश पटेल हे मुख्यमंत्री म्हणून नवे होते. मंत्रिमंडळातून सर्व जुने चेहरे बदलून मोदी यांनी धक्का दिला. ती कोरी पाटी घेऊन मोदी निवडणुकीत उतरले. त्याचा फायदा झाला. दुसरे म्हणजे, मोदी यांच्यामुळे गुजरात प्रगतीपथावर वेगाने पुढे जात आहे. अनेक जगतिक दर्जाचे सोहळे गुजरातमध्ये होत आहेत व जागतिक नेते साबरमती, अहमदाबादेत उतरतात ते मोदींमुळेच. महाराष्ट्रासारख्या राज्यातील अनेक मोठे उद्योग गुजरातेत याच काळात पळवून नेले गेले. त्याचाही फायदा निवडणुकीत झालाच आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

“गुजरातमध्ये गांधी किंवा सरदार पटेल यांचे भव्य पुतळे उभारले आहेत. पण मोदी हीच गुजरातची ओळख व अस्मिता आहे. गुजरातच्या मतदारांनी ते दाखवून दिले. ‘आप’ व केजरीवाल यांनी गुजरातेत येऊन फक्त हवा केली. गुजरातेत पुढचे सरकार आमचेच अशी बतावणी केली. त्यांच्या सभांना गर्दी झाली. पण ‘आप’ने काँग्रेसची मते खाल्ली. मतविभागणी घडवून एक प्रकारे भाजपचा विजय सहज केला. अर्थात ‘आप’ नसती तरी भाजपच जिंकणार होता. पण काँग्रेसची स्थिती कदाचित इतकी बिघडली नसती. गुजरातमध्ये आप व ‘एमआयएम’ने भाजपचा पराभव करण्यापेक्षा काँग्रेसचे नुकसान केले हेसुद्धा नाकारता येणार नाही. सगळय़ांनाच भाजपचा पराभव करायचा होता, पण एकमेकांच्या पायात पाय अडकवून त्यांनी भाजपच्या विजयाचाच मार्ग मोकळा केला,” असं शिवसेनेने सांगितलं आहे.

“अर्थात, भाजपने गुजरात जिंकले तरी राजधानी दिल्लीतील महानगरपालिका व हिमाचल प्रदेश हातचे गमावले आहे. गुजरातचे निकाल भाजपसाठी जितके ऐतिहासिक तितकेच दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या नाकासमोर झालेला भाजपचा पराभव ऐतिहासिकच म्हणावा लागेल. दिल्ली महानगरपालिकेत भाजपची 15 वर्षे सत्ता होती. ती उलथवून टाकण्यात ‘आप’ला यश आले. दिल्ली ही देशाची राजधानी आहे व पंतप्रधान मोदींचे राजकारणाचे केंद्रस्थान आहे. येथे मोदींची जादू का चालू शकली नाही? गुजरात तर मोदींचेच होते, पण दिल्ली जिंकणे ही खरी कसोटी होती. तसेच हिमाचल प्रदेशचे म्हणावे लागेल,” अशी टीकाही शिवसेनेने केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply