दुबईहून आलेल्या प्रवाशाकडून समुद्रातील 466 जीवंत प्रवाळ जप्त

पुणे : दुबईहून आलेल्या दोन प्रवाशांकडे समुद्रातील 466 जीवंत प्रवाळ आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी दोघांना पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दोघांना ताब्यात घेतले आहे. तर मुंबईतील तारापोरवाला मत्स्यालयाकडे जप्त केलेले प्रवाळ तत्काळ पुनर्वसनासाठी पाठविले.

सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही व्यक्तींची माहिती घेतली जात असून त्यांच्याविरुद्ध सीमाशुल्क कायदा व वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाचे उपायुक्त धनंजय कदम यांनी दिली. दोघांची सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी प्रवाळ व्यावसायिक कारणासाठी आणल्याची कबुली दिली.

धनंजय कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटेच्या सुमारास दुबईहून आलेल्या जेट एअरवेज कंपनीच्या विमानातुन दोन तरुण लोहगाव येथील विमानतळावर उतरले. त्यानंतर त्यांनी अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी असणाऱ्या ग्रीन चॅनलमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी त्यांच्याकडील बॅगेची तपासणी केली. तेव्हा, त्यांना बॅगेमध्ये प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्ये जीवंत प्रवाळ आढळून आले. एका बरणीमध्ये 100 तर दुसऱ्या बरणीमध्ये 366 जीवंत प्रवाळ आढळून आले. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील प्रवाळ ठेवलेल्या दोन्ही बरण्या जप्त केल्या. त्यानंतर दोन्ही बरण्यांमधून एकूण 466 जीवंत प्रवाळ पुनर्वसनासाठी मुंबईतील तारापोरवाल मत्स्यालयाकडे सोपविण्यात आले. तसेच प्रवाळांच्या तस्करीचा प्रकार पहिल्यांदाच उघड झाल्याने सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दोन्ही तरुणांची सखोल चौकशी केली जात आहे.

उच्चभ्रु कुटुंबांमध्ये घरातील सौंदर्यात भर घालण्यासाठी ऍक्वेरीयममध्ये दिसायला रंगीत व आकर्षक असणारे जीवंत प्रवाळ ठेवले जातात. याबरोबरच वैद्यकीय कारणांसाठी देखील प्रवाळांचा वापर होतो. अधिकाधिक आकर्षक असणाऱ्या प्रवाळांना तितकीच जास्त किंमत मिळते. बाराशे रुपयांपासून ते 18 हजार रुपयांपर्यंत या प्रवाळांची किंमत असू शकते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply