'थर'थराट...! गोविंदांचा उत्साह शिगेला, ठाण्यात 'या' पथकाला ९ थरांच्या सलामीचा मान

मुंबई: राज्यभरात आज गोपाळकालाचा  उत्साह पाहायला मिळत आहे. कोरोना संकटामुळं जवळपास दोन वर्षांनी दहीहंडी साजरी होत आहे. त्यामुळे गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला पोहचला आहे.

महाराष्ट्रात दहीहंडीचं एक वेगळं आकर्षण आणि परंपरा आहे. विशेषत: मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्ये दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. विविध मंडळांकडून दहीहंडी उत्सवामध्ये मानवी मनोरे लावणाऱ्या गोविंदा पथकांना लाखोंच्या बक्षीस देण्यात येतात. त्यामुळे मुंबई, पुण्यातील गोविंदा पथकं मनोरे रचायला सज्ज असतात.

दोन वर्षांपासून दहीहंडी बंद होती. त्यामुळे या वर्षीच्या दहीहंडी उत्सवात गोवांदामध्ये चांगलाच उत्साह बघायला मिळत आहे. याच जल्लोषाचं महत्वाचं आकर्षण ठरली आहे ती ठाण्यातील नौपाडा येथील मनसे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांची दहीहंडी, कारण या दहीहंडीला ९ थरांची सलामी देण्यात आली आहे. कोकण नगर जोगेश्वरी गोविंदा पथकाकडून ही पहिली ९ थरांची सलामी देण्यात आली आहे.

राज्यभरात मागील काळामध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीचा प्रभाव देखील आजच्या दहीहंडीवर पाहायला मिळत आहे. शिवसेनेचा बाल्लेकिल्ला असणाऱ्या ठाणे आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. मात्र, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळी मुळे आता सेनेत फूट पडली असून याचे पडसाद आजच्या दहीहंडी उत्सवात पाहायला मिळतं आहेत.

टेंभी नाका इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीसाठी लावण्यात आलेले बॅनर राजकारणाचा विषय ठरत आहेत. तर येथून ५०० मीटर अंतरावर असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या गटातील खासदार राजन विचारे यांच्या निष्ठेच्या हंडीचे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे शिंदे विरुद्ध ठाकरे गट असं बॅनरवॉर पाहायला मिळेतं आहे.

ठाण्यातील मानाची मानली जाणारी आणि आनंद दिघे यांनी सुरू केलेली अशी टेंभी नाक्याच्या दहीहंडीची ख्याती आहे. या हंडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लावणार आहेत. यावर्षी टेंभीनाका दहीहंडी उत्सवाचे हे ८१ वे वर्ष असून आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या दहीहंडी ची सूत्र एकनाथ शिंदे हे पुढे चालवत आहेत. यावर्षी शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर टेंभी नाक्याच्या या दहीहंडी ला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

तर मुंबईतील बोरिवली मागाठाणे येथे देखील शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीचे देखील एक वेगळे आकर्षक असते. प्रकाश सुर्वे यांच्या मागाठाणे मतदारसंघात या दहीकाला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, मुख्यमंत्री एकनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित राहणार आहेत.

सुर्वे यांच्या हंडीला खालीलप्रमाणे बक्षीस देण्यात येणार आहे.

५ थर - ३ हजार रुपये

६ थर - ५ हजार रुपये

७ थर - ७ हजार रुपये

८ थर - २१ हजार आणि 9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना 1 लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply