‘तुमच्या सरकारमध्ये याकुब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण’ झाल्याचं विचारताच अजित पवार संतापले; म्हणाले “उद्या तू मुख्यमंत्री असता तर तुझ्या काळातही व्हायला नको होतं ”

मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करण्यात आल्याने राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनच्या कबरीभोवती टाइल्स आणि एलईडी लाइट्स लावण्यात आल्याची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि कारवाई करण्यात आली. पण यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. महाविकास आघाडीच्या काळात हे सुशोभीकरण झाल्याने भाजपा नेते टीका करत आहेत. दरम्यान, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना टीकेला उत्तर दिलं आहे.

दक्षिण मुंबईतील मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनची कबर आहे. या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आले होते. फुलांच्या पाकळ्यांनी ही कबर सजवण्यात आली होती. ही जागा ‘बेरियल वक्फ बोर्डा’च्या अख्यत्यारीत येते. यानंतर पोलिसांनी कारवाई केली असून, एलईडी लाईट्स काढून टाकल्या.

भाजपा नेते राम कदम यांनी याकुब मेमनच्या कबरीचे फोटो ट्वीट करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. हे उद्धव ठाकरेंच्या आशिर्वादाने घडतंय की मुंबई प्रेमातून? असा खोचक सवाल कदम यांनी विचारला आहे. महाविकासआघाडी सरकारच्या काळात या कबरीचे सुशोभीकरण करण्यात आले, असा आरोप कदम यांनी केला. उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यासाठी माफी मागावी, अशी मागणी कदम यांनी केली.
 
“त्यावेळी जर तसं झालं असेल तर कोणीतरी लक्षात आणून द्यायला हवं होतं. मला तर आत्ता तुम्ही प्रश्न विचारला तेव्हा माहिती मिळाली. मी यासंबंधी माहिती घेईन. पण देशद्रोही, समजाकंटक यांचा कोणीही विचार करु नये, चांगल्या गोष्टी बोलण्याचाही प्रयत्न करु नये असं माझं स्पष्ट मत आहे,” असं अजित पवारांनी सांगितलं.

भाजपा नेत्यांकडून होणाऱ्या टीकेबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले “‘लक्ष्य करण्याशिवाय यांच्याकडे दुसरे मुद्दे नाहीत. यांना महागाई, बेरोजगारीसंबंधी बोलता येत नाही. शेतकरी हवालदिल झाला असून रोज आत्महत्या करत आहे. त्याला ताठमानेने उभं करण्यासाठी मदत करत नाही. आणि लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ही निती आहे. या गोष्टीला महत्त्व देण्याचं कारण नाही”.

तुमच्या सरकारमध्ये सुशोभीकरण झाल्याचं विचारण्यात आलं असता अजित पवारांनी, “कोणाचंही सरकार असू द्या ना, तू मुख्यमंत्री असता तर तुझ्या काळातही व्हायला नको होतं,” असं उत्तर दिलं.

१९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात आर्थिक सहभाग आढळल्यानंतर याकुब मेमनला न्यायालयाने दोषी ठरवले होते. क्षमायाचनेच्या याचिका फेटाळल्यानंतर याकुबला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात ३० जुलै २०१५ रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली होती. या बॉम्बस्फोट प्रकरणात याकुबचा भाऊ टायगर मुख्य संशयित आरोपी आहे. मुंबई बॉम्बस्फोटात २५७ जणांनी आपला जीव गमावला होता. जवळपास १४०० हून अधिक नागरिक या स्फोटात जखमी झाले होते.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply