जेजुरी : आदित्य ठाकरे खंडोबा गडावर;भंडाऱ्याची उधळण,प्राचीन तलवारही उचलली

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी जेजुरी गडावर येऊन दर्शन घेतले. भंडारा-खोबऱ्याची उधळण त्यांनी केली. गडावरील एक मण वजणाची प्राचीन तलवारही त्यांनी उचलली.

आदित्य ठाकरे येणार असल्याने दुपारपासूनच कार्यकर्त्यांनी जेजुरीत मोठी गर्दी केली होती. संध्याकाळी त्यांचे जेजुरीत आगमन होताच आतषबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर ते खंडोबा गडावर गेले. त्यांच्या समवेत आमदार सचिन अहिर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख राजेंद्र काळे, हवेली शिवसेनाप्रमुख संदीप धाडसी मोडक, तालुकाप्रमुख अभिजित जगताप, जेजुरी प्रमुख किरण डावलकर, डॉ. प्रसाद खंडागळे आदी उपस्थित होते.

खंडोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त तुषार सहाणे, विश्वस्त राजकुमार लोढा, शिवराज झगडे यांनी खंडोबाची प्रतिमा देऊन आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले. मुख्य मंदिरामध्ये पूजा करून त्यांनी देवदर्शन घेतले. पितळी कासवावर तळी भंडारा करून भंडार खोबऱ्याची उधळणही केली. देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी गडावर असलेली प्राचीन एक मण वजनाची तलवार उचलण्याचे प्रात्यक्षिक त्यांना दाखवले. आदित्य ठाकरे यांनीही ही तलवार हातामध्ये उचलून घेतली. खंडोबा गडावर पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना काही राजकीय प्रश्न विचारले. मात्र, या वेळी मी खंडोबा देवाच्या दर्शनासाठी आलो असल्याने इतर कोणत्याही विषयावर बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply