जळगाव : एसटीची चाके रूळावर; जळगाव विभागात साडेतीन हजाराहून अधिक कर्मचारी रूजू

जळगाव : राज्‍य परिवहन महामंडळाची बस अर्थात लालपरी आता रूळावर येत आहे. जळगाव जिल्‍ह्यातील सर्वच आगारातून कर्मचारी कामावर रूजू होत आहेत. जिल्‍ह्यात आतापर्यंत ३ हजार ५१४ कर्मचारी रूजू झाल्‍याने जवळपास सर्वच बसफेऱ्या सुरू झाल्‍या आहेत. 

राज्‍य परिवहन महामंडळाचे राज्‍य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी जवळपासून साडेपाच महिने एसटी कर्मचारी  संपावर होते. संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याची अंतिम तारीख दिली आहे. त्यानुसार अनेक कर्मचारी कामावर रुजू होत असून, जळगाव जिल्ह्यातील आगारात मिळून तब्बल ३ हजार ५१४ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.

तरीही ६७९ कर्मचारी अद्याप संपात

विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ७ नोव्हेंबरपासून काम बंद आंदोलनाला सुरुवात केली होती. तेव्‍हापासून सुरू असलेला संप आता हळूहळू मिटू लागला आहे. कामावर रुजू होण्याबाबत वेळोवेळी महामंडळाकडून आवाहन केले. यानंतर जळगाव विभागातील ३ हजार ५१४ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. तरी देखील अद्याप ६७९ कर्मचारी हे संपात सहभागी आहेत.

जळगाव विभागातील जवळपासून ८० टक्‍के कर्मचारी हे आजच्‍या स्‍थीतीला कामावर रूजू झाले आहेत. यामुळे लांबपल्‍ल्‍यासह स्‍थानिक फेऱ्या देखील वाढल्‍या आहेत. शिवाय अमळनेर व जामनेर आगारातून ग्रामीणच्‍या फेऱ्या देखील सुरू केल्‍या आहेत. यामुळे जळगाव विभागातून दिवसभरात ४ हजाराच्‍यावर फेऱ्या होत आहेत. फेऱ्या वाढल्‍याने विभागाला सोमवारी दिवसभरात ५९ लाख रूपयांचे उत्‍पन्‍न मिळाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply