गणेश बिडकर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा, कसबा पोटनिवडणुकीत पैसे वाटपाच्या आरोपावरून गुन्हा दाखल झालेले भाजपचे दुसरे माजी नगरसेवक

पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीत पैसे वाटप केल्याच्या आरोपावरून भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांच्यासह कार्यकर्त्यांच्या विरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

या प्रकरणी गणेश बिडकर यांच्यासह मयूर चव्हाण, नईम शेख, बाला शेख यांच्या विरुद्ध अदखलपात्र (एनसी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत युवक काँग्रेस कॅन्टोन्मेंट विभागाचे माजी अध्यक्ष फैयाज कासम शेख (वय ३८, रा. २१६ मंगळवार पेठ, मालधक्का चौक) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बिडकर आणि त्यांचे कार्यकर्ते रविवारी (२६ फेब्रुवारी) दुपारी दोनच्या सुमारास मंगळवार पेठेतील आएशा काॅम्प्लेक्समध्ये कार्यकर्त्यांसह आले होते. फैयाज शेख आणि त्यांचे मित्र याकूब बशीर शेख या भागात फिरत होते. त्या वेळी भाजपाचे कार्यकर्ते आएशा काॅम्प्लेक्समध्ये पैसे वाटप करत असल्याची माहिती शेख यांना मिळाली.

त्यानंतर शेख तेथे गेले. तेव्हा भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या हातात केशरी रंगाची पिशवी दिसून आली. पिशवीत मतदार स्लिप ठेवण्यात आल्या होत्या. पिशवीत पैसे असल्याचे शेख यांना समजले. त्यांनी बिडकर आणि कार्यकर्त्यांकडे विचारणा केली. तेव्हा त्यांनी फैयाज आणि याकूब शेख यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली, असे फैयाज शेख यांनी पोलिसांकडे दिलेल्या अदखलपात्र तक्रारीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक माळी तपास करत आहेत.

दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीत रविवारी पैसे वाटप करण्यात आल्याचे आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. गंज पेठ भागात पैसे वाटप केल्याच्या आरोपावरून दोन गटात वाद झाला. या प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक विष्णू हरिहर यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हरिहर यांच्या कार्यकर्त्यांनी परस्पर विरोधी फिर्याद दिली असून, एका गटाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply