औरंगाबाद : दानवेंच्या हुकूमशाहीला कंटाळून शिवसेना सोडली; नरेंद्र त्रिवेदी यांचा आरोप

औरंगाबाद : जिल्ह्यातील सहापैकी पाच आमदार सोडून गेले, एवढ्या मोठ्या प्रमाणात संघटनेत फूट पडली. याची नैतिक जबाबदारी आमदार अंबादास दानवे यांनी जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे होता, मात्र त्यांना विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदाचे बक्षिस मिळाले, अशी टीका शिंदे गटात प्रवेश केलेले जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी करून आमदार दानवे यांच्यावर हुकूमशाहीचा आरोप केला.

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे दुसरे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, फुलंब्री तालुकाप्रमुख राजेंद्र ठोंबरे व अन्य काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यानंतर शनिवारी शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन श्री. त्रिवेदी यांनी श्री. दानवे यांच्या हुकूमशाहीला कंटाळून पक्ष सोडल्याचा आरोप केला.

श्री. दानवे यांच्या काळात शिवसेनेत मोठ्या प्रमाणात गटबाजी वाढल्याचा आरोप करून पाच आमदार शिवसेना सोडून शिंदेंसोबत गेले. त्याचवेळी नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे होता, पक्ष नेतृत्वानेही तो घ्यायला पाहिजे होता. मात्र, त्यांना उलट विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदाची बक्षिसी मिळाल्याचे श्री त्रिवेदी म्हणाले. यावर काय कारण आहे, असे विचारले असता त्रिवेदी म्हणाले ते कान भरण्यात, कटकरस्थाने करण्यात पक्के आहेत. त्यांच्याकडे काही काळी जादू असेल असा आरोप केला.

नरेंद्र त्रिवेदी हे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. मात्र, त्रिवेदी यांनी खैरे-दानवे यांच्यामुळेच संघटना सोडल्याचे सांगितले. त्रिवेदी म्हणाले, मी १९८६ पासून शिवसेनेत कार्यरत आहे, शाखाप्रमुख पदापासून मी कामाला सुरूवात केली. पण गेल्या दहा वर्षात जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची पक्षात सुरू असलेली हुकूमशाही पाहता आता इथे थांबणे शक्य नाही. माझ्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थितीत करणाऱ्या दानवेंनी माझ्याकडे असलेल्या मतदारसंघातील कामगिरीचा देखील आढावा घ्यावा.

ज्या मतदारसंघात पक्षाला फटका बसला होता, तिथे मी पुढच्या निवडणुकीत शिवसेनेला मताधिक्य मिळवून दिल्याचे सांगितले. उलट लोकसभेत चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात कोणी काम केले हे काही लपून राहिले नाही. स्थानिकांची भांडणे, हुकूमशाही आणि मुस्कटदाबी होत असल्याने मला बाहेर पडावे लागल्याचे सांगून आणखीन बरेच जण माझ्यासोबत येतील असे श्री. त्रिवेदी यांनी सांगितले.

शाखांची बांधणी करणार

जिल्हाप्रमुख श्री. जंजाळ म्हणाले, आमच्यासोबत आणखी बरेच जण येणार आहेत. फुलंब्रीतील २० सरपंच येणार आहेत. शहरातील काही नगरसेवकदेखील आमच्यासोबत येणार आहेत. मात्र, आधीच पेपर फोडल्यानंतर परीक्षा देण्यात मजा राहणार नाही म्हणून महापालिका निवडणुकीच्यापूर्वी चित्र बघायला मिळेल. तोवर मुंबईच्या धर्तीवर शाखा स्थापन केल्या जातील, शाखाप्रमुखांच्या नियुक्त्या केल्या जाणार असल्याचे सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply