“आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यास कारवाई”

मुंबई : एखाद्या विद्यार्थ्याकडे आधार कार्ड नाही म्हणून त्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. याबाबत तक्रार आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज विधान परिषदेत दिली. शिक्षक आमदार नागो गाणार व आमदार निरंजन डावखरे यांनी आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांचे नाव संच मान्यतेच्या संख्या अहवालात गाळली जात असल्याची बाब प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केली होती. आमदार गाणार यांनी यावेळी राज्यातील शिक्षण अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड संदर्भात करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती सभागृह समोर मांडली. शिक्षणाधिकारी मुख्याध्यापकांना तंबी देतात की, ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नाही, त्यांचे नाव शिक्षण विभागाच्या यादीत पाठवू नका. ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नाही, त्यांचे नाव हजेरी पटावरून कमी करा, असे सांगितले जाते. त्यावर वर्षा गायकवाड यांनी उत्तर दिले. आधार कार्ड नाही म्हणून कोणत्याही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. जे शिक्षणाधिकारी अशाप्रकारे विद्यार्थ्यांना वंचित ठेवण्याचे काम करतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. अशी माहिती गायकवाड यांनी दिली. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नाही, त्यांना ते काढून घेण्यासाठी सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply