अहमदनगर : जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांड : ‘नार्को’त मानवी हक्कांचे उल्लंघन

अहमदनगर : जवखेडे खालसा हत्याकांडात नार्को चाचणी करण्यासाठी पोलिसांनी सहा जणांची परवानगी न्यायालयाकडून घेतली. प्रत्यक्षात दोघांची नार्को चाचणी केली. नार्को चाचणी करतानाही मानवी हक्क आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन झालेले आहे. नार्को चाचणी ही असैविधानिक आहे. या चाचणीचा वापर आरोपींच्या विरोधात पुरावा म्हणून करता येणार नसल्याबाबतचे न्यायनिवाडे आरोपींच्या वकिलांनी बचावाच्या समर्थनार्थ सादर केले. प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यर्लागड्डा यांच्यासमोर जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांडाची सुनावणी सुरू आहे. आरोपींच्या वतीने सुनील मगरे, नितीन मोने, छगन गवई, सिद्धार्थ उबाळे, अरूण चांदणे हे काम पाहत आहेत. जवखेडे खालसा येथील संजय, जयश्री आणि सुनील जाधव या तिघांच्या हत्याकांडाचा उलगडा होण्यासाठी न्यायालयाकडे सहा जणांच्या नार्को चाचणीची परवानगी मागितली होती. हिराबाई वाघ, बाळू माळी, बबन रामकिसन कराळे, अनिल कराळे, प्रशांत जाधव आणि अशोक जाधव यांची नार्को चाचणी करण्यास न्यायालयाने परवानगी दिली होती. न्यायालयाकडे परवानगी घेताना हे संशयित आरोपी किंवा साक्षीदार असा स्पष्ट उल्लेख केलेला नाही. तत्कालिन अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी अहमदाबाद येथील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत सर्वांना घेऊन गेले. परंतु, त्या ठिकाणी फक्‍त प्रशांत आणि अशोक जाधव यांची नार्को चाचणी केली. न्यायालयाने सहा जणांची नार्कोची परवानगी दिलेली असताना पोलिस प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून फक्‍त दोघांचीच नार्को चाचणी केली. नार्को चाचणी करताना मानवी हक्क आयोगाने मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. आरोपींना चाचणीदरम्यान वकिलाला उपस्थित ठेवण्याचा अधिकार आहे. याचे उल्लंघन झाले आहे. या नार्को चाचणीचा अहवाल न्यायालयास न देता पुन्हा परवानगी न घेता दुसऱ्यांदा नार्को चाचणी केली. ही चाचणी असैविधानिक आहे. नार्को चाचणीतील माहिती ही आरोपींविरुद्ध पुरावा म्हणून वापरता येणार नाही, याबाबतचे सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे न्यायनिवाडे सादर केले.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply