अहमदनगर : एका प्लेटची किंमत २० रुपये का लावली? वडा-पावच्या वादातून खून

नगर तालुका : १५ रुपये किमतीची वडा-पावची प्लेट २० रुपयांना का लावली, यावरून झालेल्या वादात एका मजुराचा खून झाला. एमआयडीसीतील सह्याद्री चौकात ही धक्कादायक घटना घडली. पप्पू ऊर्फ प्रवीण रमेश कांबळे (वय ३५, रा. दत्त मंदिराजवळ, बोरुडे मळा, बालिकाश्रम रस्ता, सावेडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

शोभा रमेश कांबळे (वय ५५) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींमध्ये अमोल बाबासाहेब सोनवणे, अमोल भाऊसाहेब साळवे (दोघे रा. रोकडे मळा, वडगाव गुप्ता रस्ता, नवनागापूर), पुरुषोत्तम कुमार गुप्ता, अरुण नारद शहा, संकेत विठ्ठल सोमवंशी (तिघे रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) व बबड्या ऊर्फ बाबासाहेब केरू गव्हाणे (रा. रोकडे मळा, नवनागापूर) यांचा समावेश आहे.प्रवीण कांबळे हा एमआयडीसीत हमालीचे काम करायचा. मंगळवारी दुपारी प्रवीण व त्याचा मित्र अमोल बोर्डे (रा. निंबळक, ता. नगर) अरुण शहा याच्या सह्याद्री चौकातील रेणुकामाता वडा-पाव सेंटरवर गेले होते. प्रवीणने अरुणकडे वडा-पाव मागितले. १५ रुपयांची प्लेट २० रूपयांना लावल्याने अरुण व प्रवीण यांच्यात बाचाबाची झाली.

त्यावेळी प्रवीणला शिवीगाळ, दमदाटी करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तेथून प्रवीण व अमोल बोर्डे दुचाकीवरून निघून गेले. एमआयडीसीतील रस्त्याने ते जात असताना पाठीमागून आलेल्या पाच ते सहा जणांनी त्यांच्याकडील लोखंडी गज, कुऱ्हाड, लाकडी दांडक्याने प्रवीणला मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या प्रवीणला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस उपअधीक्षक अजित पाटील, सहायक निरीक्षक आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिसांनी पाच आरोपींना तत्काळ अटक केली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply