अमरावतीतील हत्येचा नूपुर शर्मा प्रकरणाशी संबंध ; राज्यात सत्तांतर होताच पोलिसांचा नवा दावा, आधीचा तपास निष्कर्ष मोडीत

अमरावती : येथील औषध व्यावसायिकाच्या हत्येचा संबंध नूपुर शर्मा प्रकरणाशी नसल्याचा दावा करणाऱ्या पोलिसांनी राज्यात सत्ताबदल होताच घूमजाव केले आणि  हत्येचा संबंध नूपुर प्रकरणाशी असल्याची कबुली शनिवारी दिली.

औषध व्यावसायिक उमेश कोल्हे यांची २१ जून रोजी हत्या करण्यात आली होती. नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाजमाध्यमावर संदेश प्रसारित केल्यामुळेच हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्टपणे नाकारले होते आणि पैसे लुटण्याच्या प्रयत्नातून हत्या झाल्याचा निष्कर्ष काढला होता. आता मात्र पोलिसांनी हत्येच्या घटनेचा नूपुर शर्मा प्रकरणाशी संबंध असल्याचे स्पष्ट केले आहे.  कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. कोल्हे यांनी समाजमाध्यमावर नूपुर शर्मा यांचे समर्थन करणारा संदेश प्रसारित केला होता. तपासात ही घटना नूपुर शर्मा प्रकरणाशी संबंधित असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले असून उर्वरित तपास सुरू आहे, असे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले.

कोल्हे दुकान बंद करून दुचाकीने घरी जात असताना रात्री १०.३० वाजता श्याम चौकातील घंटाघर परिसरात त्यांच्यावर चाकूने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून सहा जणांना अटक केली. मुदस्सीर अहमद ऊर्फ सोनू रजा शेख इब्राहिम (२२), शाहरुख पठाण उर्फ बादशाह हिदायत खान (२५), अब्दूल तौफिक ऊर्फ नानू शेख तस्लिम (२४), शोएब खान उर्फ भुऱ्या साबीर खान (२२), अतिब रशीद आदिल रशीद (२२) आणि युसूफ खान बहादूर खान (४४) अशी आरोपींची नावे आहेत. एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तीन आरोपींनी कोल्हे यांच्यावर सलग तीन दिवस पाळत ठेवली होती. दररोज रात्री कोल्हे दुकान बंद करून घंटाघरमार्गे घरी जातात, हे आरोपींच्या लक्षात आले होते. पाळत ठेवणाऱ्या आरोपींनी आपल्या साथीदारांना ही माहिती दिली. घटनेच्या दिवशी दोन दुचाकींवरून आलेल्या आरोपींनी कोल्हे यांना रोखले आणि त्यांच्या गळय़ावर चाकूने वार केले, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे सुरुवातीला दोन आरोपींना अटक केली आणि नंतर इतर चार आरोपींना ताब्यात घेतले.

कोल्हे यांच्या हत्येचा नूपुर शर्मा प्रकरणाशी सबंध आहे का, याचा तपास ‘एनआयए’ने करावा, अशी मागणी खासदार डॉ. अनिल बोंडे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली होती. या हत्येचा नूपुर शर्मा प्रकरणाशी संबंध असल्याचे भाजपनेते वारंवार सांगत होते. पण पोलीस या घटनेबाबत कुठल्याही प्रकारची माहिती माध्यमांना देण्यास तयार नव्हते. अखेरीस भाजपच्या नेत्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्रालयात दाद मागितल्यानंतर पोलिसांनी असा संबंध असल्याचे मान्य केले.

नूपुर शर्मा यांचे समर्थन करणारे संदेश प्रसारित केल्यामुळे काही दिवसांपूर्वी उदयपूर येथे एका व्यावसायिकाची हत्या करण्यात आली. अमरावती आणि उदयपूरच्या घटनेत काही साम्यस्थळे आहेत का? आरोपी कुठल्या संघटनेशी संबंधित आहेत? कोल्हे यांना कोणी धमकावले होते का? याचाही छडा तपास यंत्रणा लावणार आहेत.

तपास ‘एनआयए’कडे

कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला आहे. गृहमंत्री कार्यालयाने ‘ट्विटर’द्वारे ही माहिती दिली. हे प्रकरण आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविण्यात आले असून या हत्येचे षडयंत्र, संघटनांचा सहभाग आणि आंतरराष्ट्रीय संबंध याचा संपूर्ण तपास केला जाणार असल्याचे संदेशात म्हटले आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply