अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आज मतदान ; मतदारांना घराबाहेर काढण्याचे शिवसेनेसमोर आव्हान

मुंबई : अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज, गुरुवारी मतदान होत असून, एकतर्फी होणाऱ्या या लढतीत मतदारांना घराबाहेर काढण्याचे शिवसेनेसमोर मोठे आव्हान असेल. मतदारांमधील निरुत्साहामुळेच शिवसेनेने आपल्या हक्काच्या मतदारांना मतदानाकरिता बाहेर काढण्याकरिता कार्यकर्त्यांची फौज सज्ज ठेवली आहे.

पोटनिवडणुकीत एरव्हीही निरुत्साह असतो. सर्वसाधारण निवडणुकीच्या तुलनेत पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का कमीच असतो. अंधेरी पूर्व मतदारसंघात भाजपच्या माघारीमुळे पोटनिवडणुकीतील चुरस संपली. तसेच भाजपच्या माघारीमुळे पोटनिवडणूक होणारच नाही, असे चित्र निर्माण झाले. या पार्श्वभूमीवरच मतदान किती होते याची शिवसेनेला चिंता आहे. जास्तीत जास्त मताधिक्याने ही जागा जिंकण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. आपले हक्काचे मतदार घराबाहेर पडावेत म्हणून शिवसेनेने आजूबाजूच्या परिसरातील शिवसैनिकांना अंधेरीत पाठविले आहे. घरोघरी जाऊन मतदानासाठी बाहेर या, असे आवाहन कार्यकर्ते मतदारांना करणार आहेत. 

पोटनिवडणुकीतील चुरस संपल्याने मतदारांमध्येही निरुत्साह जाणवतो. तरीही आम्ही जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून मतदानाकरिता बाहेर यावे, असे आवाहन केले आहे, असे शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितले. मतदारांना घराबाहेर काढण्याचे मोठे आव्हान असेल. महाविकास आघाडीचे हक्काचे मतदार घराबाहेर पडतील, असा विश्वास परब यांनी व्यक्त केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply