अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार, ऋतुजा लटकेंचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा

भाजपाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपाने मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा दिलासा आहे. या निवडणुकीवरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरुद्ध भाजपाअसा संघर्ष सुरु असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्रामुळे वळण मिळालं. त्यानंतर वेगाने घडामोडी सुरु झाल्या आणि अखेर ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंबंधी माहिती दिली.

“५१ टक्के आम्ही ती लढाई जिंकलोच असतो. आमची पूर्ण तयारी झाली होती. आम्ही रणांगणात असून, वॉर्डात जुळवाजुळव झाली होती. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात आम्ही १०० टक्के निवडणूक जिंकणार होतो. पुढील निवडणुकीला एकच वर्ष शिल्लक आहे हा विचारही करण्यात आली. यापूर्वी भाजपाने अनेकदा असा निर्णय घेतलाआहे. ही संस्कृती आजची नसून अटलबिहारी वाजपेयी यांच्यापासून अनेक उदाहरणं आहेत,” असं चंद्रशेखखर बावनकुळे यांनी सांगितलं.

भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी रविवारी राज ठाकरे यांची भेट घेत, भाजपा उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती केली होती. राज ठाकरे यांनी मात्र भाजपाची विनंती अमान्य करीत उलट तुम्हीच या निवडणुकीतून माघार घेत लटके यांना पाठिंबा देण्याची विनंती करीत भाजपाची कोंडी केली होती. राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक लढवू नका, असं आवाहन केलं होतं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply