१९ लाख शेतकऱ्यांना मदत होणाऱ्या ‘स्मार्ट प्रोजेक्ट’ला गती द्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजपासून मंत्रालयातील आपल्या दालनातून कामकाजास प्रारंभ केला. आज मंत्रालयात दाखल होताच एकनाथ शिंदे तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सध्या सुरु असलेल्या तसेच मागील काही प्रकल्पांचा आढवा घेतला. या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी आज खास बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अॅग्री बिझनेस सोसायट्या निर्माण करुन १९ लाख शेतकऱ्यांना मदत होणाऱ्या शितिवषयक प्रकल्पाला फास्ट ट्रॅकवर आणण्याचे निर्देश देण्यात आले. या प्रकल्पापासाठी जागतिक बँकेने एकूण ३ हजार कोटी रुपयांची मदत केलेली आहे. याबाबत सविस्तर माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

“२०१९ साली आपण स्मार्ट प्रोजेक्ट (बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प ) मंजूर केला होता. त्यानुसार महाराष्ट्रात दहा हजार अॅग्री बिझनेस सोसायट्या तयार करुन १९ लाख शेतकऱ्यांना मदत करण्याचे नियोजन होते. या प्रकल्पाला जागतिक बँकेने ३ हजार कोटी रुपये दिले होते. दुर्दैवाने मागील अडीच वर्षात या प्रकल्पात आपण केवळ १५ कोटी रुपये खर्च करु शकलो. या प्रकल्पाला फास्ट ट्रॅकवर आणण्यासाठी आज बैठक झाली. या प्रकल्पासंदर्भात एक वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. जागतिक बँकेचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. आम्ही पैसे कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि पिकांची व्हॅल्यू चैन तयार करण्यासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून फार फायदा होणार आहे,” अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

आजच्या आढावा बैठकीत राज्यातील पुरस्थिती तसेच मराठवाड्यातील पाणीटंचाई यावरदेखील चर्चा करण्यात आली असून या समस्या सोडवण्यासाठीच्या प्रकल्पांचा आढवा घेण्यात आला. याविषयी बोलताना, “आज जागतिक बँकेसोबत आणखी एक बैठक झाली. मागील काळात सांगली आणि कोल्हापूरला पूर आला होता. दरवर्षी असाच पूर आला, तर काय करायचे यावर आपण अभ्यास केला होता. जागतिक बँकेच्या मदतीने आपण एक अप्रुव्हल घेतलं होतं. यामध्ये वळण बंधारे आणि टनेल सिस्टीमच्या माध्यमातून पाणी मराठवाड्याकडे वळवता येईल का? यावर अभ्यास करण्यात आला,” अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

तसेच, “सांगली आणी सोलापूर भागातील जे पुराचं पाणी आहे; ते महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या हिश्श्याव्यतिरिक्त आहे. तेव्हा आपण त्यावर अभ्यास केला होता. आज पुन्हा एकदा जागतिक बँकेसोबत आपण बैठक घेतली. त्यांची या प्रकल्पाला मदत करण्याची पूर्ण तयारी आहे. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातही निर्देश दिले आहेत. त्यामुळे याचा डीपीआर तयार करुन जागतिक बँकेकडे देण्यात यावा, असे निदेर्शही देण्यात आले आहेत,” अशी माहिती फडणवीस यांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply