विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल असल्याचे बोलेले जात आहे

राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. शिवसेना आणि काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणावर फुटल्याने पुरेशी मते नसतानाही भाजपाचे पाचही उमेदवार निवडून आले. दहाव्या जागेसाठी काँग्रेसच्याच दोन उमेदवारांमध्ये लढत झाली आणि पक्षाचे पहिले उमेदवार चंद्रकांत हंडोरे हे पराभूत झाले, तर भाई जगताप यांचा विजय झाला आहे. यानंतर आता शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल असल्याचे बोलेले जात आहे. याबाबत आता शिवसेना नेत्या मनीषा कायंदे  यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“या सगळ्या अफवा आहेत आणि असे काही नाही. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील प्रमुख नेते आहेत. त्यांच्यावर पक्षाची जबाबदारी असल्याने या सगळ्या अफवा आहेत. यामध्ये काहीही तथ्य नाही. एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत की नाही याच्याबद्दल पण मला शंका आहे. विरोधी पक्षातील लोकांना हे सर्व बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. महाविकास आघाडीची एक जागा यायला हवी होती. पण ती का नाही आली यावर तिन्ही पक्षातील लोक विचार करतील,” अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी टिव्ही९ सोबत बोलताना दिली.

“संध्याकाळी आम्ही जेव्हा पक्ष कार्यालयात जमलो तेव्हा स्वतः एकनाथ शिंदे आमच्यासोबत उपस्थित होते. उद्धव ठाकरेंच्या शेजारीबसून ते सर्व आमदारांची विचारपूस करत होते. पण थोड्यावेळात त्यांच्याबाबत स्पष्टता येईल. एकनाथ शिंदे किती कार्यमग्न असतात याची आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे ते काही वेळात ते आपल्या संपर्कात असतील याची मी ग्वाही देऊ शकते,” असे शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोरे म्हणाल्या.

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत सचिन अहिर व आमश्या पडवी हे शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आले खरे पण पक्षाचे ५५ आमदार असताना या दोघांना पहिल्या पसंतीची ५२ मते मिळाल्याने शिवसेनेची तीन मते फुटल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शिवसेनेचे दोन्ही सिंह निवडून आले पण गडाला मात्र खिंडार पडले अशी अवस्था झाली. याशिवाय सेनेच्या सहयोगी आमदारांच्या मतांचे काय असा प्रश्नही निर्माण झाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

तर दहाव्या जागेसाठी भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, उलटेच झाले. दहाव्या जागेसाठी काँग्रेसच्या भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांच्यातच लढत झाली. काँग्रेसने हंडोरे यांच्यासाठी पहिल्या पसंतीच्या २९ मतांची व्यवस्था केली होती. परंतु, हंडोरे यांना २२ मतेच मिळाली. यावरून काँग्रेसची सात मते फुटल्याचे स्पष्ट झाले. राज्य काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव, पक्षांतर्गत बेदिली असल्याने काँग्रेसला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply