वर्धा न्यायालयात पुन्हा सापडला चाकू; २४ तासांतील दुसरी घटना

वर्धा : दाखल प्रकरणात न्यायालयात सुनावणीदरम्यान आरोपीने थेट न्यायाधीशांसमोर महिला वकिलावर चाकूहल्ला केला. या घटनेला २४ तास उलटत नाही तोच पुन्हा बुधवारी (ता. २३) न्यायालय परिसरात एक युवक चाकू घेऊन आढळून आला. अनुचित प्रकार घडण्याआधीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चाकू जप्त केला. प्रज्वल पाझारे (वय २१, रा. आनंदनगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, येथील जिल्हा न्यायालयात झालेल्या चाकूहल्ल्यामुळे येथे सुरक्षेच्या दृष्टीने मेटल डिटेक्टर लावण्यात आले. यातून जाताना प्रज्वल पाझारे याच्याजवळ चाकू असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याच्याजवळून चाकू जप्त केला. प्रज्वल याला येथे पेशी असलेल्या मिथुन नावाच्या आरोपीचा फोन आला. त्यामुळे प्रज्वल हा त्याच्या मित्राला घेऊन न्यायालय परिसरात दाखल झाला. पहिल्या गेटमधून प्रवेश करत न्यायालयाच्या मुख्य इमारतीत शिरताना त्याची तपासणी करण्यात आली. दरम्यान, त्याच्याजवळ काळ्या रंगाचा एक फूट लांब असलेला चाकू आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत त्याला ताब्यात घेतले.

न्यायालय परिसरात वकील महिलेवर चाकूहल्ला झाल्याच्या घटनेने वकिलांमध्ये भीतीचे वातावण निर्माण झाले आहे. सर्वोच्च व्यवस्था असलेल्या न्यायालयात आरोपी चाकू घेऊन गेल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झाले. यामुळे येथे सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात उपाययोजना आखण्यासंदर्भात मागणी करण्यात आली होती. त्यावरून मुख्य प्रवेशद्वारावर डिटेक्टर लावण्यात आले. यात पुन्हा एक युवक चाकू घेऊन आल्याने वकिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply