“राज ठाकरेंसोबत होतो म्हणून मंत्रिपद दिलं नाही,” रामदास कदम यांचा गंभीर आरोप

शिवसेनेत दोन गट पडल्यापासून शिंदे गटातील नेते आपली खदखद वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करत आहेत. शिंदे गटात नुकतेच सामील झालेले शिवसेना नेते रामदास कदम यांनीदेखील शिवसेनेच्या नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत. मी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत असल्यामुळे मला १९९५ साली मंत्रिपद देण्यात आले नाही, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे. एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या मुलाखतपर कार्यक्रमात ते बोलत होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला खूप काही दिलं. पण १९९५ साली आमची सत्ता आल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात असूनही मी मंत्री का झालो नाही, हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारावं. तुझं नाव मंत्र्यांच्या यादीमध्ये आहे. पण तुला मंत्रिमंडळात घेण्यावरुन माझ्या घरी भांडण होत आहे, असे मला बाळासाहेबांनी त्यावेळी सांगितले होते. फक्त मी राज ठाकरे यांच्यासोबत होतो, म्हणून मला मंत्रिपद दिले गेले नाही,” असा आरोप रामदास कदम यांनी केला.

“मी राज ठाकरे यांच्यासोबत होतो, म्हणून मला मंत्रिपद दिले गेले नाही. राज ठाकरे यांच्यासोबत असणाऱ्यांना मंत्रिपद द्यायचे नाही, अशी भूमिका कदाचित त्यांची होती. मी तुला मंत्रिमंडळात घेणार, असे मला बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. पण माझ्यामुळे तुमच्या घरात भांडण होत असतील तर मी थांबतो, असे मी बाळासाहेब ठाकरे यांना सांगितले होते,” असे रामदास कदम यांनी सांगितले.

तसेच पुढे बोलताना कदम यांनी शिवसेना नेते अनिल परब यांच्या रिसॉर्टची माहिती भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिल्याच्या आरोपावरही भाष्य केले. “किरीट सोमय्या यांना रिझवान काझी यांनी माहिती दिली होती. किरीट सोमय्या यांना सर्व माहिती मी दिली आहे, असे रिझवान काझी यांनी स्वत: सांगितलेले आहे. अनिल परब यांची माणसं मला हफ्ते मागत होते, म्हणून मी हे केले, असे काझी यांनी सांगितलेले आहे. मी तुळजाभवानी, बाळासाहेब ठाकरे तसेच माझ्या तीन मुलांची शपथ घेऊन सांगतो, की आजपर्यंत मी किरीट सोमय्या यांना कधीच बोललो नाही. हे सगळं कटकारस्थान अनिल परब यांनी केले,” असे कदम यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply