मुंबई: कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू पाहणाऱ्यांवर पोलिसांना कडक कारवाईचे आदेश, सुट्ट्याही रद्द; पोलीस महासंचालक अ‍ॅक्शन मोडमध्ये

मुंबई: राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला चार तारखेचा अल्टीमेटम दिला होता. तो उद्या संपत आहे. त्या अनुषंगाने आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालकांची बैठक घेतली. त्यानंतर पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेवून राज्यातील जनतेला आवाहन केले आहे. पोलीस महासंचालक म्हणाले की नुकतीच गृहमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. महाराष्ट्र पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्यात सक्षम आहे. या पूर्वी समाजकंटक व गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. एसआरपी आणि होमगार्डची कुमक तैनात करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू पाहणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत सर्व वरिष्ठांना गरज वाटल्यास सर्व अधिकारांचा वापर करण्याची पूर्व कल्पना दिली आहे. सामाजिक एकोपा जपण्यासंदर्भात स्थानिक नागरिकांमध्ये बैठका घेतलेल्या आहेत असे पोलीस महासंचालक रजनीश सेठ म्हणाले. कायद्याची अंमलबजावणी करण्यास सांगून नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये. जो कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल त्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे महासंचालक म्हणाले. राज ठाकरेंवरती कारवाई होणार का? या प्रश्नावर पोलीस महासंचालक म्हणाले की औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचा अभ्यास केला असून ते योग्य ती कारवाई करतील. कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई होईल असेही रजनीश सेठ म्हणाले आहेत. पुढे रजनीश सेठ म्हणाले की आम्ही १५ हजार लोकांवर प्रतिबंधक कारवाई केली आहे. १३ हजार लोकांना १४९ ची नोटिस दिली आहे. धुळे येथे तलवारींचा साठा मिळाला त्या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. ही हत्यारं जालना येथे नेली जात होती. संपूर्ण महाराष्ट्रात पोलिसांना अलर्ट राहण्यास सांगितलं आहे. आतापर्यंत सर्व धर्मिय नागरिकांची बैठक घेतली आहे. नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. राज ठाकरेंच्या पुढच्या सभेला परवानगी देणार का? या प्रश्नावर पोलीस महासंचालक म्हणले ''पुढच्या सभेचं पत्रक आल्यानंतर परिस्थिती पाहून परवानगी दिली जाणार''.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply