मुंबई : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांवर शुभेच्छा वर्षाव;

मुंबई: राज्याच्या राजकारणातील अनेक नाट्यमय घडामोडींनतर आज एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. हा शपथविधी सोहळा राजभवन येथे पार पडला.

महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभेल अशाच प्रकारे सर्व विरोधकांनी आणि सहकारी पक्षांनी देखील या नवीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यभरातील सर्व नेत्यांच्या प्रतिक्रिया खालीलप्रमाणे आहेत.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत पेजवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हिंदीमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आपण स्वीकारत आहात, याचा आनंद वाटत आहे. तुम्हाला ही सुवर्ण संधी मिळाली असून तुम्ही तुमच्या स्वतःच्या कर्तृत्वाने ती जबाबदारी पार पाडाल अशी अपेक्षा आहे. आपण सावध रहा आणि विचार करून कृती करा, तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन. अशा शुभेच्छा मनसेने दिल्या आहेत.

तर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झालेले मा.एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री पद भूषवणारे देवेंद्र फडणवीस यांचं मनःपूर्वक अभिनंदन! हे नवीन सरकार राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासहित राज्याच्या विकासाचा गाडा देखील वेगानं पुढे हाकतील, अशा सदिच्छा व्यक्त करतो. अशा शब्दात अजित पवारांनी आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. याबद्दल त्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! तसंच राज्याच्या उप मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी अभिनंदन करत अनेक प्रश्न मार्गी लावाल असा विश्वास असल्याचं म्हटलं आहे. याबाबत पवार यांनी फेसबुक केली असून या पोस्टमध्ये ते लिहितात,' राज्याचे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा! महाराष्ट्राचं पुरोगामित्व कायम ठेवून कोणताही भेदभाव न करता सर्व घटकांना सोबत घेऊन महाराष्ट्र विकासाच्या मार्गावर असाच धावत रहावा, यासाठी आपण प्रयत्न कराल, ही अपेक्षा!

तसंच राज्याचे केंद्राकडं अडकलेले #GST चे पैसे आणणं, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं, मुंबई मेट्रोशेडसाठी पर्यायी जागा मिळवणं, मराठा-धनगर-ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणं आदी विषयांबाबत निर्णय घेण्यास आपण भाजपला भाग पाडाल, असा विश्वास आह.' अशा शुभेच्छा रोहित पवारांनी दिल्या आहेत.

तसंच मागील अनेक दिवसांपासून भाजपला समर्थन देणारे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी देखील नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला आहे. हिंदुत्व आणि महाराष्ट्र हितासह ठाणे जिल्ह्याचाही सर्वांगीण विकास होईल या अपेक्षांसह श्री.एकनाथजी शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनसे अभिनंदन व शुभेच्छा असं ट्विट पाटील यांनी केलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply