‘महावितरण’कडून वीजपुरवठ्याचा महाविक्रम

औरंगाबाद : उन्हाळ्यामुळे राज्यात विजेच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये मंगळवारी (ता. १५) महावितरणने मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित भागात आजवरच्या सर्वाधिक मागणीनुसार वीजपुरवठ्याचा महाविक्रम नोंदविला आहे. राज्यातील मागणीप्रमाणे ‘महावितरण’ने तब्बल २३ हजार ६०५ मेगावॉट विजेचा सुरळीत व अखंडित वीजपुरवठा केला. दरम्यान मुंबईसह राज्यात या दिवशी २७ हजार २१२ मेगावॉट विजेची मागणी नोंदविण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे गेल्या महिन्याभरात विजेच्या उच्चांकी मागणीने इतिहास घडवला आहे. यापूर्वी १९ फेब्रुवारीला महावितरणकडून सर्वाधिक उच्चांकी २३ हजार २८६ मेगावॉट विजेचा पुरवठा करण्यात आला होता. त्यापूर्वी ८ फेब्रुवारीला २३ हजार ७५ तर १२ फेब्रुवारीला २३ हजार १६३ मेगावॉटचा मागणीप्रमाणे विक्रमी वीजपुरवठा करण्यात आला. महावितरणने मंगळवारी (ता. १५) महानिर्मितीकडून ६ हजार ५७८ मेगावॉट, एनटीपीसी व एनपीसीआयएलकडून एकूण ४ हजार ९११ मेगावॉट तसेच अदानी पॉवर, रतन इंडिया, जेएसडब्लू, साई वर्धा, एम्पो या खासगी प्रकल्पांमधून ४ हजार ७२२ मेगावॉट वीज उपलब्ध केली आहे. त्याचप्रमाणे नवीकरणीय ऊर्जेच्या स्रोतांतून सौर ऊर्जा २५८५ मेगावॉट, पवन ऊर्जा ६०३ मेगावॉट तसेच सह वीजनिर्मिती प्रकल्पांतून १५०० मेगावॉट अशी एकूण ४ हजार ६८८ मेगावॉट वीज उपलब्ध झाली. उर्वरित विजेची मागणी ही कोयना व इतर जलविद्युत प्रकल्पांतून १ हजार ६१२ मेगावॉट वीजनिर्मिती करून तसेच मुक्त ग्राहक व रेल्वेच्या वीजनिर्मिती स्रोत्रातून ७२२ मेगावॉट आणि पॉवर एक्स्चेंजमधून ३७२ मेगावॉट विजेची खरेदी करून पूर्ण केली आहे. विजेची मागणी २४ हजार मेगावॅटवर जाणार सुरळीत पुरवठ्यामुळे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कौतुक केले आहे. ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनात आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या नेतृत्वात विविध स्त्रोतांमधून विजेची विक्रमी मागणी पूर्ण करण्यात महावितरणने यश मिळविले. सद्य:स्थितीत विजेची मागणी २३ हजार ते २३ हजार ५०० मेगावॅट दरम्यान आहे. मात्र, तापमानात वाढ होत असल्याने येत्या काही दिवसांमध्ये ही मागणी २४ हजार मेगावॅटच्या घरात जाण्याची शक्यता आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply