भाजपा नेत्यांनी 'भिकारचाळे' बंद करावे ; चंद्रकांत पाटील यांच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेस नेते संतापले

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची बौध्दीक दिवाळखोरी निघाली असून महापुरुषांबद्दल अपमान करणारी वक्तव्ये करताना त्यांना जराही संकोच वाटत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यावर भाजपाच्या एकाही नेत्यांने अजून माफी मागितली नसताना मंत्री चंद्राकात पाटील यांनी महात्मा ज्योतीबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य करुन आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

'चंद्रकांत पाटील यांना भीक, लोकवर्गणी व देणगी यातील फरक तर कळतो का ? असा संतप्त सवाल देखील नाना पटोले यांनी विचारला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना पटोले म्हणाले की, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजातील गोर-गरिबांच्या मुलांसाठी शाळा सुरु करुन शिक्षणाचे दरवाजे उघडे केले. बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी या महापुरुषांनी आपल्याकडे जे होते ते सर्वस्व दिले'.

'लोकांकडून वर्गणी, देणगीच्या स्वरुपात पैसे जमा केले व शाळा उघडल्या. लोकसहभातून शैक्षणिक संस्थांचा विस्तार गावखेड्यात केला. ह्या महान कार्यासाठी त्यांनी ‘भीक’ मागितली असे म्हणून चंद्रकात पाटील यांनी या महापुरुषांचा, त्यांनी केलेल्या महान कार्याचाच अपमान केला असे नाही तर बहुजन समाजाचाही अपमान केला आहे, अशी टीका पटोले यांनी केली.

'समाजाच्या विकासासाठी सरकारने निधी खर्च करणे त्यांचे कर्तव्यच आहे. शिक्षणावर खर्च करायचा नाही तर मग काय सरकारच्या जाहीरातबाजीवर करोडो रुपयांची उधळपट्टी करायची काय? सरकार जनतेच्या आरोग्य, शिक्षणासह कल्याणकारी योजनांवर पैसा खर्च करणार नाही तर मग कशावर करणार? असा सवाल करत पटोले यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

'सरकार जनतेसाठी पैसे खर्च करते म्हणजे काय उपकार करत नाही, जनतेचा पैसा जनतेसाठीच वापरायचा असतो हे चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या मंत्र्याला माहित नसावे, कारण त्यांचा पक्ष दोन-चार उद्योगपतींच्या दावणीला बांधलेला आहे आणि या उद्योगपतींच्या घरीच चंद्रकांत पाटील यांच्या पक्षाचे सरकार पाणी भरते आणि जनतेच्या प्रश्नावर मात्र उलटे प्रश्न विचारते, असेही पटोले म्हणाले.
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply