भव्य उद्घाटन सोहळय़ासह राष्ट्रकुलला प्रारंभ

बर्मिगहॅम : बर्मिगहॅम शहराचा समृद्ध संगीत वारसा आणि सर्वसमावेशकता याचे दर्शन घडवणाऱ्या भव्य उद्घाटन सोहळय़ासह गुरुवारी मध्यरात्री २२व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला प्रारंभ झाला. 

अलेक्झांडर स्टेडियममध्ये झालेल्या या सोहळय़ाची ड्रमर अब्राहम पॅडी टेटेच्या सादरीकरणाने सुरुवात झाली. मग विविध सादरीकरणांच्या माध्यमातून बर्मिगहॅम शहराची विविधता दर्शवण्याचा प्रयत्न झाला. यात भारतीय शास्त्रीय गायिका आणि संगीतकार रंजना घटक यांच्या सादरीकरणाचाही समावेश होता. करोनानंतर कोणत्याही कठोर निर्बंविना होणारी ही पहिलीच जागतिक दर्जाची क्रीडा स्पर्धा असल्याने उद्घाटन सोहळय़ाला चाहतेही मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते.

त्यानंतर सहभागी राष्ट्रांच्या संचलनाला सुरुवात झाली. दोन ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांनी ध्वजवाहकाच्या भूमिकेत भारताच्या पथकाचे नेतृत्व केले. ब्रिटनच्या राष्ट्रगीतासह या अडीच तास चाललेल्या सोहळय़ाची सांगता झाली.

लवलिनाला क्रीडा नगरी गाठण्यात अडचणी

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती बॉक्सिंगपटू लवलिना बोरगोहेनने गुरुवारी उद्घाटन सोहळा अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला. शनिवारी पहिली लढत खेळायची असल्याने शुक्रवारी सकाळी लवकर सराव करण्याच्या उद्देशाने लवलिनासह भारताचा अन्य बॉक्सिंगपटू मुहम्मद हुसामुद्दीनने अलेक्झांडर स्टेडियममध्ये झालेल्या उद्घाटन सोहळय़ातून बाहेर पडून क्रीडा नगरीत परतायचे ठरवले. मात्र, त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. भारतीय पथकाला तीन गाडय़ा देण्यात आल्या आहेत. परंतु उद्घाटन सोहळा रात्री उशिराने असल्यामुळे या गाडय़ांच्या चालकांच्या कामाची वेळ संपली होती. भारतीय खेळाडू बसमधून अलेक्झांडर स्टेडियममध्ये गेले होते. त्यामुळे परत येण्यासाठी लवलिना आणि मुहम्मद यांना वाहन उपलब्ध नव्हते. अखेर त्यांनी मिळेल त्या बसमधून परत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, ही बाब भारतीय बॉक्सिंग महासंघाचे उपाध्यक्ष राजेश भंडारी यांना फारशी आवडलेली नाही.

हॉकी : भारताचा घानावर विजय

सविता पुनियाच्या नेतृत्वाखालील भारताच्या महिला हॉकी संघाने शुक्रवारी अ-गटात घानावर ५-० असा विजय मिळवला. या सामन्यात भारताने चारही सत्रांत वर्चस्व गाजवले. गुर्जित कौरने (तिसऱ्या मिनिटाला, ३९ व्या मि.) दोन गोल केले, तर नेहा गोयल (२८ व्या मि.), संगीता कुमारी (३६व्या मि.) आणि सलिमा टेटे (५६ व्या मि.) यांनी प्रत्येकी एकेक गोल केला.

बॅडिमटन  :भारताची पाकिस्तानवर सरशी

भारताने सांघिक बॅडिमटन प्रकारात पाकिस्तानवर ३-० अशी आरामात सरशी साधली. बी. सुमीत रेड्डी आणि मॅचिमँडो पोनप्पा जोडीने मिश्र दुहेरीत मुहम्मद भट्टी आणि घाझाला सिद्धिकी जोडीला २१-९, २१-१२ असे हरवले. मग पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांतने मुराद अलीचा २१-७, २१-१२ असा फडशा पाडला. तिसऱ्या महिला एकेरीच्या लढतीत पीव्ही सिंधूने महूर शेहझादचा २१-७, २१-६ असा पराभव केला.

टेबल टेनिस : भारताची विजयी सलामी

मनिका बत्राच्या नेतृत्वाखालील भारताच्या महिला टेबल टेनिस संघाने शुक्रवारी गट-२ मध्ये दक्षिण आफ्रिकेला ३-० असे हरवून विजयी सलामी नोंदवली. दुहेरीत श्रीजा अकुला आणि रीथ टेनिसन जोडीने लैला एडवर्डस आणि डॅनिशा पटेल जोडीला ११-७, ११-७, ११-५ असे नमवले. पहिल्या एकेरी लढतीत गतविजेत्या मनिकाने मुशफिकर कलामचे आव्हान ११-५, ११-३, ११-२ असे मोडीत काढले. दुसऱ्या एकेरीत श्रीजाने डॅनिशाचा ११-५, ११-३, ११-६ असा पाडाव केला.

’ भारताच्या पुरुष संघाने बार्बाडोसला ३-० असे पराभूत केले

बॉक्सिंग : शिवाचा एकतर्फी विजय

आघाडीचा बॉक्सिंगपटू शिवा थापाने राष्ट्रकुल मोहिमेला दमदार प्रारंभ करताना ६३.५ किला वजनी गटात पाकिस्तानच्या सुलेमान बालोचवर ५-० असा एकतर्फी विजय मिळवला.

जलतरण ’ पुरुषांच्या १०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात श्रीहरी नटराजने ५४.६८ सेकंद वेळेसह तिसरा क्रमांक मिळवला आणि उपांत्य फेरीत स्थान मिळवले.

’ पुरुषांच्या ५० मीटर बटरफ्लाय प्रकारातील सहाव्या शर्यतीत साजन प्रकाशने २५.०१ सेकंदांसह आठवे स्थान मिळवल्याने उपांत्य फेरी गाठू शकला नाही.

’ पुरुषांच्या ४०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात कुशाग्र रावतने ३:५७.४५ सेकंद वेळ नोंदवत अखेरचा क्रमांक पटकावला. त्यामुळे त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

सायकलिंग ’ पुरुषांच्या सांघिक स्प्रिंट पात्रता स्पर्धेत भारतीय संघाला सहाव्या क्रमांकावर (४४.७०२) समाधान मानावे लागल्याने पदकफेरी गाठता आली नाही.

’ महिलांच्या सांघिक स्प्रिंट पात्रता स्पर्धेत भारतीय संघाला सातव्या क्रमांकावर (वेळ ५१.४३३) समाधान मानावे लागल्याने आगेकूच करता आली नाही.

ट्रायथलॉन ’ पुरुषांच्या वैयक्तिक (स्प्रिंट) शर्यतीत भारताच्या आदर्श नायर (१:००:३८) आणि विश्वनाथ यादव (१:०२:५२) यांना अनुक्रमे ३०व्या आणि ३३व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

लॉन टेनिस ’ पुरुषांच्या तिहेरी प्रकारातील दुसऱ्या फेरीत भारताने स्कॉटलंडविरुद्ध १२-१९ असा पराभव पत्करला.

’ महिला एकेरीत तानिया चौधरीने डाफणे आर्थर-अलमोंडकडून २०-२१ असा पराभव पत्करला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply