‘पुनर्वसु’ नक्षत्राने दाखवले रौद्र रूप; नांदेड जिल्ह्याला पावसाने झोडपले

मागील दोन-तीन दिवसांपूर्वी निघालेल्या ‘पुनर्वसु’ नक्षत्राने रौद्र रूप दाखवत नांदेड जिल्ह्याला पावसाने शुक्रवारी रात्रीपासूनच झोडपायला सुरूवात केली असून रात्रभर पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले. शेजारील हिंगोली जिल्ह्यात पडलेल्या पावसाचा फटकाही नांदेडला बसला असून आसना नदीने रौद्र रूप धारण केल्याने नांदेड-मालेगाव-वसमत महामार्गावरील वाहतूक बंद पडली. जिल्ह्यातील काही तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली.

मृगनक्षत्रानंतर दडी मारलेल्या पावसाचे पुनर्वसु नक्षत्रात आगमन झाले. शुक्रवारी रात्रीपासून शहर तसेच जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली आहे. जोरदार पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्यामुळे रस्ते बंद झाल्याचे पहावयास मिळाले. नांदेड शहरासह अनेक जागी ढगफूटीसदृश पाऊस झाला. या कोसळलेल्या पावसामुळे हजारो हेक्टरवरील जमीन खचल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

वीज कोसळून मुलीचा मृत्यू –

या पावसादरम्यान भोकर तालुक्यातील भुरभुशी गावात वीज कोसळून 15 वर्षीय मुलगी आडेला नारायण डमेवाड हिचा मृत्यू झाला आहे. अर्धापूर तालुक्यातील बामणी येथे सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीचे काम करत असताना अचानक पूर आल्याने विहिरीचा काही भाग कोसळून या घटनेत दोन मजूर अडकले होते. त्या मजुरांना एसडीआरएफच्या पथकाने शनिवारी सकाळीच बाहेर पुरातून सुखरूप सुटका केली.

जिल्ह्यात मुदखेड व अर्धापूर तालुक्यात 110 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. त्या खालोखाल नांदेड-95.70 मि.मी., उमरी-76.10 मि.मी., भोकर-78.10 मि.मी., बिलोली-60.20 मि.मी., लोहा-69.90 मि.मी., कंधार-52.90 मि.मी., हदगाव-49.30 मि.मी., हिमायतनगर 60.80 मि.मी., धर्माबाद-65.70 मि.मी., नायगाव-61.10 मि.मी., देगलूर-29.90 मि.मी., किनवट-30.80 मि.मी., मुखेड-30.60 मि.मी. असा 58.80 मि.मी. पावसाची नोंद झाल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

अनेक गावांचा संपर्क तुटला –

आसना नदीला आलेल्या पुरामुळे नांदेड महामार्गावरील पूल बंद करण्यात आला होता. शहरातील कौठा, सिडको, तसेच मुदखेड, मुखेड, अर्धापूर या तालुक्यातील सखल भागात पावसाचे पाणी शिरले. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. अर्धापूर तालुक्यातील शेलगाव (खु.), शेलगाव (बु.), शेणी, कोंढा, गणपूर, देळूब (खु.), देळूब (बु.) यासह अनेक गावांचा संपर्क तुटला. या बाबीची माहिती नांदेडच्या जिल्हाधिकार्‍यांना समजताच त्यांनी एसडीआरएफच्या पथकासह अर्धापूर तालुक्यातील गावांना भेटी दिल्या. मुदखेड तालुक्यातील वैजापूर पार्डी या गावाला सिता नदीला पूर आल्याने वेढा पडला तर राजवाडी येथील एका शेतकर्‍याची बैलजोडी वाहून गेल्याचेही सांगण्यात आले. शनिवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती.

विष्णुपुरीचे दोन दरवाजे उघडले –

नांदेड शहर व जिल्ह्यातील काही भागासाठी वरदान ठरलेल्या विष्णुपुरी शंकरसागर जलाशयाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे प्रशासनाने पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी दोन दरवाजे उघडले आहेत. या दोन दरवाजांमधून 812 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग केला जात असल्याचे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply