पुणे : हडपसर येथील उड्डाण पुल बंद असल्याने गर्दीतही फेरीवाले-पथारीवाले रस्त्यावर

पुणे : हडपसरमधील उड्डाण पुल वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे रस्त्यावर वाहनांची खच्चून गर्दी असल्याने डोळ्यात तेल घालून वाहन चालवावे लागत आहे. तरीसुद्धा अशा परिस्थितीमध्ये गाडीतळ ते मंडई दरम्यान पुण्याकडे जाणाऱ्या पदपथ आणि रस्त्यावर पथारीवाले आणि भाजीविक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अतिक्रमण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे की आतबट्ट्याच्या व्यवहारामुळे पथारी-भाजीविक्रेत्यांनी दुकाने थाटली, असा संतप्त सवाल वाहनचालकांनी उपस्थित केला. हडपसर उड्डाण पुल वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे हडपसर गाडीतळ ते गांधी चौक दरम्यान रात्रंदिवस रस्त्यावर वाहनांची खच्चून गर्दी आहे. उन्हाचा तडाका, वाहनांची गर्दी, ध्वनी आणि वायूप्रदूषणामुळे वाहनचालक त्रासले आहेत. प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई त्यातच एखाद्या पादचाऱ्याला रस्ता ओलांडताना कसरत करावी लागत आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, शाळकरी मुले आणि अपंगांनी तर घराबाहेरच पडायचे नाही, असा अलिखित फतवाच सरकारने काढला आहे का, असा संतप्त सवाल वृत्तपत्र विक्रेत्या नीलिमा बढे यांनी उपस्थित केला. दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचण्यासाठी कसरत करावी लागत आहे. नेहमीपेक्षा एक तास घरातून लवकर निघूनही परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचताना नाकीनऊ येत आहेत, असे स्वामिनी कांबळे या विद्यार्थिनीने सांगितले. रुग्णवाहिका वाहतूककोंडीत अडकल्याने उपचाराविना रुग्णाची तडफड होत आहे. अनेक दुकानदारांनी ग्राहकांना येण्यासाठी रस्ता नसल्याने दुकाने बंद ठेवली आहेत. उड्डाण पुलाखाली बसविलेल्या पथारीवाल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. उड्डाण पुलाच्या दुरुस्तीची गती वाढवून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी सामान्यजणांकडून केली जात आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply