पुणे : सिंहगडावर सहलीसाठी गेलेल्या महाविद्यालयीन युवकाचा बुडून मृत्यू

पुणे : सिंहगडावर सहलीसाठी गेलेल्या महाविद्यालयीन युवकाचा हत्ती टाकेत बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवारी दुपारी घडली.शाहिद मुल्ला (वय १८) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मोशीतील प्रियदर्शनी कनिष्ठ महाविद्यालयात बारावीमध्ये शिकत होता. या महाविद्यालयातील ६० विद्यार्थी आणि शिक्षक सिंहगडावर रविवारी सहलीसाठी गेले होते. दुपारी बाराच्या सुमारास शाहिद हा सिंहगडावरील देवटाके आणि हत्तीटाके परिसरात आला. पावसामुळे परिसर निसरडा झाला असून, शेवाळावरुन शाहिदचा पाय घसरला आणि तो टाकीत पडला. या घटनेची माहिती मिळताच शिक्षकांनी त्वरित सिंहगडावरील व्यावसायिकांना दिली. त्यानंतर अमोल पढेर, विठ्ठल पढेर, आकाश बांदल, विकास जोरकर, तुषार डिंबळे, पवन जोरकर, सूरज शिवतारे यांनी पाण्यात शोधमाेहीम राबवली.

शाहिदला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खेड शिवापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला. या घटनेमुळे सहकारी विद्यार्थी; तसेच शिक्षकांना धक्का बसला असून हवेली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पावसामुळे देवटाके; तसेच हत्ती टाके पाण्याने पूर्ण भरले असून टाक्यांच्या परिसरात शेवाळे जमा झाले असल्याची माहिती हवेली पोलिसांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply