पुणे : व्यापाऱ्याच्या सदनिकेतून एक किलो सोन्याचे दागिने चोरणारा अटकेत , बिबवेवाडीत घरफोडी ; गुन्हे शाखेची कारवाई

बिबवेवाडीत एका व्यापाऱ्याच्या सदनिकेतून एक किलो सोन्याचे दागिने तसेच तीन किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू, रोकड असा ३२ लाखांचा ऐवज लांबवून पसार झालेल्या चोरट्याला गुन्हे शाखेने पकडले.

मुश्तफा उर्फ बोना शकील अन्सारी (वय ३४, रा. ग्रीन पार्कजवळ, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. बिबवेवाडीतील सोबसवेरा अपार्टमेंटमधील रहिवासी प्रवीण रमेश कांडपिळे यांच्या सदनिकेतील गॅलरीची जाळी उचकटून अन्सारीने कपाटातील एक किलो सोन्याचे दागिने, तीन किलो चांदीच्या वस्तू तसेच रोकड असा ३२ लाखांचा ऐवज लांबविला होता. कांडपिळे कुटुंबीयांसह कोथरुड परिसरात श्वानाचे पिलू खरेदीसाठी गेले होते. सायंकाळी ते घरी परतले. तेव्हा शयनगृहातील कपाट उचकटून ऐवज लांबविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

गुन्हे शाखेच्या युनिट एककडून तपास करण्यात येत होता. अन्सारी सराईत चोरटा आहे. त्याच्या विरोधात खडक, वानवडी, मार्केटयार्ड, कोंढवा पोलीस ठाण्यात घरफोडीचे १८ गुन्हे दाखल आहेत. अन्सारीने कांडपिळे यांच्या सदनिकेतून ऐवज लांबविल्याची माहिती तपासात पोलीस हवालदार अजय थोरात, अमोल पवार आणि इम्रान शेख यांना मिळाली. त्यानंतर सापळा लावून अन्सारीला पकडले. चौकशीत त्याने कांडपिळेच्या सदनिकेतून ऐवज लांबविल्याची कबुली दिली. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भोसले, उपनिरीक्षक संजय गायकवाड, अजय जाधव, तुषार माळवदकर, अय्याज दड्डीकर, रुक्साना नदाफ आदींनी ही कारवाई केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply