पुणे : रिक्षाचालकांचा मुजोरपणा प्रवाशांच्या जिवावर..

पुणे : किरकोळ कारणावरून एका प्रवासी तरुणीला शिवीगाळ करीत, तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली, तर रात्रीच्या प्रवासावेळी जादा पैसे देण्यास नकार दिल्यावरून रिक्षा चालकाने एका प्रवाशाला जबर मारहाण केली. काही दिवसांपूर्वीच घडलेल्या या घटनांमुळे पुन्हा एकदा काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रिक्षा चालकांचा मुजोरपणा प्रवाशांच्या जिवावर उठू लागला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही रिक्षाचालक पोलिसांनाही घाबरत नसल्याचे वास्तव आहे, तर पोलिसही त्यांच्याविरुद्ध ठोस कारवाई करीत नाही.

पुणे स्टेशन परिसरात सप्टेंबर २०२१ मध्ये अल्पवयीन मुलीवरील सामुहिक बलात्कार प्रकरणामध्ये काही रिक्षा चालकांचा सहभाग असल्याचे उघड झाले होते, त्यापाठोपाठ एका रिक्षा चालकाने लहान मुलीला उचलून नेत तिच्यावर बलात्कार केल्याची घटनाही शहरात घडली होती. या घटनांची पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गांभीर्याने दखल घेत रिक्षा चालकांविरुद्ध कडक कारवाई करण्यास सुरुवात केली होती. मात्र, जानेवारी महिन्यापासून पुन्हा काही रिक्षा चालकांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा प्रवाशांना फटका बसू लागल्याच्या घटना घडल्या आहेत.

रात्रीच्यावेळी प्रवाशांची अडवणूक करून जादा भाडे घेणे, जादा भाडे देण्यास नकार दिल्यास प्रवाशाला मारहाण करणे, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यापासून जीवे मारण्याची धमकी देणे, एवढेच नव्हे तर रात्रीच्यावेळी प्रवाशांना रिक्षामध्ये बसवून रिक्षाचालक त्यांच्या साथीदारांच्या मदतीने प्रवाशांची लूटमार करीत असल्याच्या घटनाही शहरात घडल्या आहेत. गुन्हा घडल्यानंतरही पोलिसांकडून गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ लागली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply