पुणे येथील लोहगाव विमानतळाचे स्थलांतर होणार नाही

पुणे : शहराच्या परिसरात नवा विमानतळ कोठेही झाला तरी, लोहगाव विमानतळाचे स्थलांतर होणार नसल्याची घोषणा खासदार आणि विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष गिरीश बापट यांनी गुरुवारी येथे केली. पुण्याच्या परिसरात होत असलेल्या नव्या विमानतळाला विरोध नाही; मात्र लोहगाव विमानतळ हा नागरिकांसाठी सोयीचा असल्यामुळे येथील सुविधा वाढविण्यावर केंद्र सरकारची भूमिका आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. विमानतळ विस्तारीकरणाचे काम ६५ टक्के पूर्ण झाले असून डिसेंबर अखेरीस ते पूर्ण होईल, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाचा आढावा घेतल्यावर बापट पत्रकार परिषदेत बोलत होते. विमानतळाचे संचालक संतोष ढोके तसेच हवाईदलाचे अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. बापट म्हणाले, ‘‘आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदरमध्ये होणार का बारामतीजवळ हे अद्याप निश्चित नाही. त्याबाबत राज्य सरकारकडून वेळकाढूपणा सुरू आहे. तसेच त्याचे काम सुरू झाल्यावर तो पूर्ण होण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागेल. दरम्यानच्या काळात पुणेकरांची गरज पाहता, लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरणाचे काम सुरू केले आहे. त्याला आणखी वेग देण्यात येईल. विमानतळासाठी केंद्र सरकारने १३ एकर जागा दिली असून त्या बदल्यात हवाई दलाला चंडीगडमध्ये जागा देण्यात येईल. कार्गोसाठीही जागा मिळाली असून प्रशासकीय प्रक्रिया आणखी वेगाने पूर्ण करण्यात येईल.’’ लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीची लांबी वाढविण्यासाठी केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांना यापूर्वीच पत्र दिले आहे. त्यानुसार विमानतळाच्या पश्चिमेकडे २५० मीटरपर्यंत धावपट्टी वाढविता येऊ शकेल. तसेच, आंतरराष्ट्रीय विमाने पुण्यात येण्यासाठी आणखी जागा लागेल. त्यासाठी शेतकऱ्यांची, एलआयसी, खासगी आणि हवाई दलाची जागा आणखी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बापट यांनी सांगितले. डिसेंबरपर्यंत विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर पुण्यातूनच थेट प्रवाशांना परदेशात जाता येईल, यावर लक्ष केंद्रित करून पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नवे विमानतळ होईपर्यंत पुण्याच्या विमानतळावरील वाहतूक सुविधा येत्या सहा महिन्यांत दुप्पट क्षमतेची होणार आहे. त्यामुळे आणखी किमान पाच वर्षांचा प्रश्न सुटेल. पूरक सुविधा वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. - गिरीश बापट, खासदार विमानतळ विस्तारीकरणाचे काम वेगाने सुरू असून पार्किंगची इमारत जुलैअखेर पूर्ण होईल आणि विस्तारीकरणाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल - संतोष ढोके,संचालक, लोहगाव विमानतळ नव्या इमारतीची वैशिष्ट्ये
  • ५ लाख २० हजार चौरस फूटबांधकाम
  • २३०० दर तासाला प्रवाशांची वाहतूक
  • ५०० विमानांची रोजची वाहतूक शक्य
  • ४७५ कोटी रुपये प्रकल्पाची किंमत
  • २ कोटी दरवर्षी प्रवाशांची ये- जा शक्य
  • ३४ चेक इन काउंटर
  • ५ एरो नवे ब्रिज
  • ७ लाउंज
  • २ मजली इमारत


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply