पुणे महापालिकेने बहुमजली अतिक्रमण पाडण्यासाठी घेतले चार कोटीचे मशिन

पुणे - भौगोलिकदृष्ट्या राज्यातील सर्वात मोठी महापालिका म्हणून पुणे महापालिकेची नोंद झालेली असताना येथे झपाट्याने अनधिकृत इमारतीही बांधल्या जात आहेत. त्यावर कारवाई करण्यासाठी महापालिकेने चार कोटी रुपये खर्च करून मेकॅनिकल माउंटेड जॉ क्रशर मशिन खरेदी केले आहे. या मशिनचे आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी लोकार्पण केले. अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, उपायुक्त माधव जगताप, महेश डोईफोडे, अधीक्षक अभियंता युवराज देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. शहरातील अनधिकृत इमारतींवर कारवाईची मोहीम महापालिका हाती घेते. एक दोन मजल्यापर्यंतच अनधिकृत बांधकाम जेसीबी व इतर मशिनच्या साह्याने पाडणे शक्य असते. पण उंच बांधकाम पाडण्यासाठी महापालिकेला मुंबई किंवा ठाण्यातून जॉ क्रशन मशिन भाड्याने मागवावे लागत होते. त्यासाठी दरवर्षाला किमान दोन कोटी रुपयांचा खर्च होत होता. त्यामुळे हा खर्च टाळून व महापालिकेच्या कारवाईत सातत्य यावे यासाठी ही मशिन खरेदी करण्याचा निर्णय चार महिन्यांपूर्वी झाला होता. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवून ही मशिन घेतली आहे.
‘हायड्रोलिक डिमॉलिशन मशिन विथ ट्रेलर’ असे हे मशिन घेतले असून, पुढील पाच वर्ष त्याचे देखभाल व दुरुस्ती संबंधित कंपनी करणार आहे. बांधकाम विभागाचे शहरात एक ते सात असे कार्यकारी अभियंत्यांच्या स्तरावर विभाग आहेत. अतिक्रमण विभागामार्फत पोलिस बंदोबस्त, मशिन व इतर यंत्रणेचे नियोजन करून साप्ताहिक वेळापत्रकानुसार कारवाई केली जात होती. पण ही मशिन भाडेतत्वावर घेतल्याने त्याचा खर्च खूप होत होता, शिवाय मुंबई, ठाण्यातून मशिन मागवावे लागत असल्याने कारवाईला दोन तीन दिवस विलंब होत होता.
महापालिकेने हे मशिन घेतल्याने अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना चांगलाच दणका बसणार आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये आपत्ती निर्माण झाल्यास तेथे मदतीसाठी हे मशिन जाऊ शकते.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply