पुणे महानगरपालिका निवडणूक : महापालिका निवडणुकीसाठी १७३ जागांपैकी ‘ओबीसी’साठी ४६ आरक्षित

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी १७३ जागांपैकी ४६ जागा इतर मागासवर्गीय समाजासाठी (ओबीसी) शुक्रवारी आरक्षित करण्यात आल्या. नव्याने काढलेल्या आरक्षणात बहुतांश सर्वपक्षीय नेत्यांना दिलासा मिळाला असला तरी काही माजी नगरसेवकांना धक्का बसला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची संख्या यामध्ये जास्त असून बदललेल्या आरक्षणामुळे कुटुंबातील महिला सदस्याला उमेदवारी द्यावी लागेल किंवा दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढवावी लागणार आहे. दरम्यान, आरक्षण निश्चित झाल्याने निवडणुकीचे चित्रही स्पष्ट झाले आहे.

प्रत्येक प्रवर्गात ५० टक्के जागा महिलांसाठी आरक्षित –

आगामी महापालिका निवडणुकीसाठी आज (शुक्रवार) बालगंधर्व रंगमंदिर येथे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. त्यानुसार ५८ प्रभागातील १७३ जागंसाठी आरक्षण काढण्यात आले. त्यामध्ये ८७ जागांवर पन्नास टक्के आरक्षणानुसार महिलांच्या जागा निश्चित करण्यात आल्या. सर्वसाधारण प्रवर्गातून १०२ नगरसेवक, मागासवर्गीय प्रवर्गातून ४६ नगरसेवक, अनुसूचित जाती प्रवर्गातून २३ तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून दोन नगरसेवकांच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. या प्रत्येक प्रवर्गात ५० टक्के जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. महापालिकेने ३१ मे रोजी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठीच्या एकूण २५ जागांचे आरक्षण निश्चित केले होते. हे आरक्षण कायम ठेवून अन्य आरक्षणांसाठी सोडत काढण्यात आली.

माजी नगरसेवकांना धक्का –

मागासवर्गीय प्रवर्ग, सर्वसाधारण प्रवर्गाबरोबच महिलांचे आरक्षण नव्याने काढण्यात आल्याने अनेक माजी नगरसेवकांना धक्का बसला आहे. शनिवार पेठ-नवी पेठ या प्रभाग क्रमांक सतरा मध्ये तीन जागांपैकी एक जागा ओबीसी महिला, दुसरी सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित आहे. तर तिसरी जागा खुल्या गटासाठी असल्याने नगरसेवकांची अडचण झाली आहे. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. या प्रभागातून निवडणूक लढविण्यास अनेक जण इच्छुक आहेत. कुणाल टिळक, हेंमत रासने, माजी नगरसेवक राजेश येनपूरे, धीरज घाटे, स्वरदा बापट यापैकी कोणाला संधी द्यायची असा प्रश्न भाजप नेतृत्वापुढे असणार आहे. फर्ग्युसन महाविद्यालय-एरंडवणा या प्रभाग क्रमांक सोळामध्येही महिलांमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच असणार आहे.

दोन माजी नगरसेवकांमध्ये एका जागेवरील उमेदवारीसाठी चढाओढ –

भुसारी कॉलनी-बावधन खुर्द या प्रभाग क्रमांक ३२ मध्ये भाजप आणि शिवसेनेतील पुरूष इच्छुकांची संख्या जास्त असल्याने उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा असेल. नांदेड सिटी-सनसिटी या प्रभाग क्रमांक ५२ मधील तीन जागांपैकी दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे दोन माजी नगरसेवकांमध्ये एका जागेवरील उमेदवारीसाठी चढाओढ राहणार आहे.

सात प्रभागात खुल्या गटाला फटका –

शहरातील ५८ प्रभागापैकी सात प्रभागांमध्ये तिन्ही जागा आरक्षित असल्याने सर्वसाधारण खुला गटासाठी जागा नसल्याने त्याचा फटका पुरूष उमेदवारांना बसला आहे. यामध्ये कोरेगांव पार्क मुंढवा हा प्रभाग क्रमांक २१, लोहगांव-विमाननगर हा प्रभाग क्रमांक तीन, जनता वसाहत-दत्तवाडी हा प्रभाग क्रमांक सदतीस, मार्केटयार्ड-महर्षीनगर हा प्रभाग क्रमांक ३९, रामटेकडी-सय्यदनगर प्रभाग क्रमांक ४२ महंमदवाडी-उरूळी देवाची प्रभाग क्रमांक ४६ आणि कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी प्रभाग क्रमांक ४७ या प्रभागंचा समावेश आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply