पुणे : प्रवाशाला मारहाण करुन रोकड लुटणारे रिक्षाचालक अटकेत ; पुणे स्टेशन परिसरातील घटना

पुणे : बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशाला मारहाण करुन त्याच्याकडील साडेसहा हजार रुपयांची रोकड लुटणाऱ्या रिक्षाचालकासह साथीदाराला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली.प्रदीप सिद्धेश्वर क्षीरसागर (वय ४०), सुजित बाबासाहेब लाटे (वय २८, दोघे रा. खराडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी एका साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सोफियान अहमद (वय ३९, रा. बरहनी, सय्यदराजा, उत्तरप्रदेश) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अहमद सकाळी साडेपाचच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानक परिसरात आले. अहमद यांना पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ येथे जायचे होते. आरोपी रिक्षाचालक क्षीरसागर आणि साथीदारांनी ४५० रुपये भाडे ठरवले.

अहमद रिक्षात बसले. त्या वेळी रिक्षाचालक क्षीरसागरचे साथीदार लाटे आणि एक जण रिक्षात होते. काही अंतरावर अहमद यांना शिवीगाळ केली.काठीने मारहाण करुन त्यांच्याकडील सहा हजार ६०० रुपये काढून घेतले. अहमद यांना वाटेत सोडून आरोपी पसार झाले.
अहमद यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर आरोपी क्षीरसागर, लाटे यांना अटक करण्यात आली. आरोपींच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *