पुणे : नदीकाठच्या रस्त्यावरील अडथळा दूर; रजपूत झोपडपट्टी परिसरातून जाणाऱ्या मार्गाचे पुणे महापालिकेकडून रुंदीकरण

पुणे : एरंडवणे येथील म्हात्रे पुलाजवळील नदीकाठच्या रस्त्यावरील अडथळा दूर झाला आहे. रजपूत झोपडपट्टीतून जाणाऱ्या आणि एक दशकाहून अधिक काळ रखडलेल्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. रजपूत झोपडपट्टी परिसरातील ३६ घरांचे महापालिकेकडून पुनर्वसन करण्यात आले आहे.सध्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असून सांडपाणी वाहिन्या टाकण्याची कामे महापालिकेकडून हाती घेण्यात आली आहेत. त्यासाठी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. येत्या दोन आठवड्यात रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे कर्वे नगर, कोथरूड, सिंहगड रोड आणि वारजे परिसराकडे जाणे सुलभ होणार असून रजपूत झोपडपट्टी परिसरात होणारी वाहतूक कोंडीही दूर होण्याची शक्यता आहे.

नदीपात्रातील शिवणे-खराडी रस्त्यापैकी डेक्कन चौपाटी ते म्हात्रे पुलाजवळील रजपूत झोपडपट्टी हा दोन किलोमीटर लांबीचा नदीकाठचा रस्ता महापालिकेने विकसित केला आहे. नदीपात्रापासून डेक्कनहून म्हात्रे पुलाकडे जाणारा रस्ता रजपूत झोपडपट्टी पररिसरातून जातो. या परिसरातील शंभर मीटर अंतरात काही झोपड्या आणि काही बैठी घरे होती. त्यामुळे या भागात सातत्याने वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाची मागणी सातत्याने होत होती. गेल्या दहा वर्षांपासूनही भूसंपादनाची आणि पुनर्वसनाची प्रक्रिया रखडली होती. मात्र आता महापालिकेने ३६ मिळकतींचे पुनर्वसन केले असून मिळकती पाडून रस्ता रुंदीकरण पूर्ण केले आहे. महापालिकेकडून ३६ मिळकतींना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक योजनेअंतर्गत घरे देण्यात आली आहेत. त्यामुळे चिंचोळा असलेला हा रस्ता काही मीटर रुंद झाला आहे.

कर्वे रस्ता आणि कोथरूड परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी येत्या काही दिवसांत आणखी काही खासगी जागांचे, मिळकतींचे संपादन करण्यात येणार आहे. त्यामुळे एक हजार २०० चौरस मीटर अंतरात रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील पाठपुरावा महापालिकेकडून सुरू झाला आहे.रस्ता रुंदीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेने सांडपाणी वाहिन्या टाकण्याची कामे महापािलकेकडून हाती घेण्यात आली आहेत. त्यासाठी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. येत्या दोन आठवड्यात सांडपाणी वाहिन्या टाकण्याची कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे.शहराच्या जुन्या हद्दच्या प्रारूप विकास आराखड्यात रजपूत झोपडपट्टी ते डीपी रस्त्या पर्यंतचा मार्ग प्रस्तावित आहे. आसपासच्या झोपडपट्ट्यांमुळे रस्ता अरुंद होता. डेक्कन जिमखाना परिसरातून आणि मुठा नदीकाठून एरंडवणेपर्यंत फक्त दुचाकीच नेत होत्या. हा मुद्दा प्रदीर्घ काळापासून प्रलंबित होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply