पुणे : देशभरात ११ डिसेंबरला भारतीय भाषा उत्सव ; विविध उपक्रम राबवण्याचे यूजीसीचे निर्देश

पुणे : महान तमिळ कवी सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीनिमित्ताने ११ डिसेंबर या दिवशी भारतीय भाषा उत्सव साजरा करण्याचा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या भारतीय भाषा समितीचा प्रस्ताव आहे. या अनुषंगाने भाषा सौहार्द निर्माण करण्यासाठी उच्च शिक्षण संस्थांमध्ये भारतीय उत्सव साजरा करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील विद्यापीठे, महाविद्यालयांना दिले आहेत. या निमित्ताने दरवर्षी विविध उपक्रम राबवण्याबाबतही स्पष्ट करण्यात आले आहे.

भारतीय भाषा उत्सव साजरा करण्याबाबत यूजीसीने परिपत्रक आणि संकल्पनापत्र संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. सुब्रमण्यम भारती हे त्यांच्या काळातील उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना जोडणारे सेतू मानले जायचे. त्यामुळे त्यांच्या जयंती दिनी भारतीय भाषा उत्सव साजरा केल्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रीय एकता मजबूत होईल. तसेच नागरिकांनी आपल्या मातृभाषेवर प्रभुत्व मिळवणे, अन्य भाषा शिकण्यासाठी प्रेरित होणे, भारतीय भाषांचा अधिकाधिक वापर केल्याने शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आर्थिक लाभांचा प्रचार होणे, भारतीय भाषांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करणे हा भारतीय भाषा उत्सवाचा उद्देश असल्याचे संकल्पनापत्रात नमूद करण्यात आले आहे. भारतीय भाषा दिनी विविध भाषांतील गाण्यांचे सादरीकरण, वक्तृत्व, लेखन स्पर्धा, भाषिक खेळ, भारतीय भाषांचे महत्त्व विशद करणारे प्रदर्शन आदी उपक्रम राबवण्याबाबत नमूद करण्यात आले आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मध्ये प्रकल्प, उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांनी भारतीय भाषांची एकात्मक शिकण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे भाषा सौहार्द निर्माण करण्यासाठी पूरक वातावरण निर्मिती होण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून मातृभाषेसह जवळच्या दुसऱ्या भाषेविषयी आस्था निर्माण होऊ शकेल. अन्य भारतीय भाषा शिकणे, बोलणे हे आनंददायी झाले पाहिजे, असे यूजीसीने स्पष्ट केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply