पुणे : दिल्लीतून बेपत्ता झालेल्या तीन अल्पवयीन मुली सुखरुप ; हॅाटेल व्यवस्थापक, रिक्षाचालक आणि पोलिसांची तत्परता

पुणे : कुटुंबीयांना कोणतीही कल्पना न देता घर सोडून आलेल्या दिल्लीतील तीन अल्पवयीन मुलींना पोलीस, हॅाटेल व्यवस्थापक आणि रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे त्वरीत मदत मिळाली. पोलिसांनी मुलींच्या कुटंबीयांशी संपर्क साधून मुली सुखरुप असल्याची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

पुणे रेल्वे स्थानकावर तीन मुली रेल्वेने आल्या. स्टेशन परिसरातील एका हॅाटेलमध्ये तीन मुली गेल्या आणि त्यांनी खोलीसाठी विचारणा केली. त्यांच्यासोबत कोणी नसल्याचे मुलींनी सांगितले. त्यामुळे हॅाटेल व्यवस्थापकासह मुलींना हॅाटेल परिसरात सोडणाऱ्या रिक्षाचालकास संशय आला. त्यांनी त्वरीत या घटनेची माहिती समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे, उपनिरीक्षक रणदिवे यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तीन मुलींना ताब्यात घेतले. चौकशीत तिघी नोकरीच्या शोधात पुण्यात आल्या होत्या. कुटुंबीयांना कोणतीही माहिती न देता त्या घर सोडून पुण्यात आल्याची माहिती चौकशीत मिळाली. त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधला.

मुली नोएडा भागातील रहिवासी आहेत. मुली बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी नोएडा येथील सेक्टर २० पोलीस ठाण्यात तक्रार दिली. समर्थ पोलिसांनी नोएडातील पोलीस उपनिरीक्षक नितीन जावला यांच्याशी संपर्क साधून मुली सुखरुप असल्याची माहिती दिली. मुलींची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने मुलींना बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *