पुणे : डीपी रस्त्यावरील मंगलकार्यालय, हॉटेलवर बुलडोझर

पुणे : गेल्या महिन्याभरापासून महापालिकेकडून अतिक्रमणांवर जोरदार कारवाई सुरू केलेली असताना आज (ता. २०) म्हात्रे पूल ते राजाराम पूल या दरम्यानची नदी पात्रालगतचे हॉटेल, मंगलकार्यालय, गॅरेजसह इतर अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चढविला. भल्या सकाळी साडे सात वाजता महापालिकेने ही कारवाई सुरू करून दुपारी एक पर्यंत ६८ अतिक्रणांवर कारवाई करून तब्बल अडीच लाख चौरस फूट जागा मोकळी केली.

म्हात्रे पूल ते राजाराम पूल या दरम्यान सुमारे दीड किलोमीटरच्या रस्त्यावर नदी पात्राच्या बाजूने अनेक मंगलकार्यालय आहेत. गेल्या काही वर्षात या रस्त्यावर विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांची रेलचेल असलेले हॉटेल सुरू झाली. त्यामुळे संध्याकाळनंतर मोठी गर्दी या भागात होते. महापालिकेने यापूर्वी एखाद दुसऱ्या मंगल कार्यालयाच्या अतिक्रमणांवर कारवाई केली, पण सरसकट सर्वच व्यावसायिकांवर कारवाई केली नव्हती. आज महापालिकेने नोटिसा बजावून पोलिस बंदोबस्तात कारवाई केली.

सकाळी सहा पासून महापालिकेने साहित्याची जमवाजमव सुरू केली. साडे सात वाजता कारवाई सुरू होताच या भागातील व्यावसायिकांची धांदल उडाली. कारवाई थांबविण्यासाठी परिसरातील हॉटेल, मंगलकार्यालय चालकांनी राजकीय नेत्यांचा दबाव आणून कारवाई थांबविण्याची मागणी केली, पण प्रशासनाने त्यास न जुमानता कारवाई केली.

या कारवाईत २० जेसीबी, ९ गॅस कटर, ३ ब्रेकरचा वापर केला. जेथे जेसीबी जाऊ शकत नाही, तेथे गॅस कटरचा वापर करून आतमध्ये घुसून शेड तोडण्यात आले. आठ पथकांच्या माध्यमातून एकाच वेळी कारवाई सुरू झाली. जेसीबने थेट बांधकाम, पत्र्याच्या शेडवर वार केला जात असल्याने हॉटेल, दुकाने, गॅरेजमधील साहित्याचे नुकसान झाले.

कार्यकारी अभियंता बिपिन शिंदे म्हणाले, ‘‘अतिक्रमण विभाग व बांधकाम विभागाने संयुक्तपणे कारवाई केली आहे. ही कारवाई करण्यापूर्वी ७३ जणांना नोटिसा दिल्या होत्या. त्यातील चार हॉटेल व एक मंगलकार्यालयावरील कारवाईस न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे उर्वरित सर्वांवर आठ पथकांच्या माध्यमातून कारवाई केली. यात तीन पोलिस अधिकारी, २५ पोलिस कर्मचारी, महापालिकेचे २०० सेवक, सुरक्षारक्षक ६०, वाहने २५, तसेच २० जेसीबी, ९ गॅस कटर, ३ ब्रेकर याचा वापर करण्यात आला. आता हे अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण पाडण्यात आले आहे, याठिकाणी पुन्हा नव्याने अतिक्रमण होऊ नये याची काळजी घेतली जाईल.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *