पुणे : गोदामात चोरीच्या उद्देशाने रखवालदाराचा खून; हडपसर भागातील खून प्रकरणाचा उलगडा, चोरटे अटकेत

पुणे : हडपसरमधील फुरसुंगी भागात एका कंपनीच्या गोदामातील रखवालदाराचा खुनाचा छडा गुन्हे शाखेने लावला. गोदामातील लोखंडी पाइप चोरण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी रखवालादाराचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

ध्रुवदेव राजेंद्र राय (वय २४), पंकजकुमार सिकंदर राय (वय २२), अजयकुमार लखदेवप्रसाद यादव (वय २४, तिघे सध्या रा. धावडे वस्ती, भोसरी, मूळ रा. बिहार) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. काशीनाथ कृष्णा महाजन (वय ५२, मूळ रा. जळगाव) असे खून झालेल्या रखवालदाराचे नाव आहे. फुरसुंगी भागातील एका गोदामात महाजन रखवालदार होते. या गोदामात लोखंडी पाइप ठेवण्यात आले होते. जळगाव येथील एका कंपनीत कामाला असलेल्या पंकजकुमार राय तेथे माल घेऊन यायचा. त्यामुळे त्याला गोदामात मोठ्या प्रमाणावर लोखंडी माल ठेवल्याची माहिती होती. गोदामाच्या परिसरातील एका खोलीत महाजन राहत होते.

मंगळवारी मध्यरात्री आरोपी राय, यादव गोदामाच्या आवारात चोरी करण्यासाठी आले. रखवालदार महाजन यांना बेदम मारहाण करुन त्यांचा खून केला. त्यांचा मोबाइल संच, एटीएम कार्ड, रोकड तसेच लोखंडी पाइप चोरुन आरोपी पसार झाले. महाजन मृतावस्थेत सापडल्यानंतर गुन्हे शाखेकडून तपास सुरू करण्यात आला. तपासात मिळालेल्या माहितीनंतर तिघा आरोपींना पकडण्यात आले. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक वैशाली गपाट, प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, अकबर शेख, दया शेगर, राजस शेख आदींनी ही कारवाई केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply