पुणे: खेड शिवापूर ते किकवी मार्गात आता उड्डाणपुलाऐवजी भुयारी मार्ग

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर खेड-शिवापूर ते किकवी या दरम्यान वाहनांसाठी भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. याबाबत सुधारित प्रस्ताव भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचएाय) मुख्य कार्यालयाला पाठविण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी विधिमंडळात दिली.

पुणे-सातारा महामार्गाच्या कामांबाबत लोकप्रतिनिधींनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘सद्य:स्थितीत ९७.५० टक्के काम पूर्ण झाले आहे. शिंदेवाडी येथील उड्डाणपुलापर्यंत जाणाऱ्या मार्गातील अतिक्रमण काढण्यास स्थानिकांचा विरोध असल्याने कामाला विलंब झाला. किकवी, शिवरे आणि खेड शिवापूर येथे स्थानिकांनी कामाला विरोध केला आणि पूर्व नियोजित पादचारी भुयारी मार्ग, पादचारी उड्डाणपुलाऐवजी वाहनांसाठी भुयारी मार्गाची मागणी केली आहे. याबाबत सुधारित प्रस्ताव एनएचएआयच्या मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आला असून मंजुरी मिळाल्यानंतर प्रलंबित कामे सुरू करण्यात येतील.’

दरम्यान, महामार्गाच्या हद्दीत झालेली अतिक्रमणे हटविण्यात येतात. शिंदेवाडी ते खेड शिवापूर पथकर नाका परिसरात काही ठिकाणी रस्त्याच्या हद्दीतील अतिक्रमणे काढण्यात आली असून उर्वरित अतिक्रमणे काढण्याचे काम सुरू आहे. सवलत करारनाम्यानुसार प्रकल्प ३० मार्च २०१३ मध्ये पूर्ण होणार होता. मात्र, जमीन हस्तांतरित करण्यास विलंब, सेवा वाहिन्या स्थलांतर करताना आलेल्या अडचणी, अतिरिक्त सुविधांची स्थानिकांची मागणी, महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमणे काढणे, स्थानिकांकडून काम थांबविणे, रस्त्याच्या हद्दीतील धार्मिक स्थळांचे स्थलांतर, भूयारी मार्गाचे ठिकाण व रुंदीत बदल करण्याची स्थानिकांची मागणी आणि करोना अशा विविध कारणांमुळे प्रकल्पाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात
पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे काम केंद्र शासनाच्या अखत्यारित आहे. सवलत करारामध्ये नमूद तांत्रिक बाबीनुसार प्रकल्पाची कामे होत आहेत आणि करारातील तरतुदीनुसार कामांच्या गुणवत्तेचे परीक्षण स्वतंत्र अभियंत्याद्वारे प्रमाणित केले जाते. रस्त्यावरील सर्व खड्डे बुजविण्यात आले असून प्रगतिपथावरील उड्डाणपुलाची कामे पूर्ण झाली आहेत. गेल्या सहा महिन्यातील झालेले अपघात वाहनांचा वेग जास्त असल्यामुळे, वाहनांच्या तांत्रिक बिघाडामुळे आणि चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे झालेले आहेत, असेही सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply