पुणे : कोयते घेऊन दहशत माजविणाऱ्यांची आता खैर नाही ; कोयता गँग विरोधात पुणे पोलीस आक्रमक; पोलिस आयुक्तांचे आदेश,

पुणे - शहरात गेल्या काही दिवसांत कोयते घेऊन दहशत माजविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत.

कोयता गॅंगसह इतर काही गुन्हेगारांकडून कोयते घेऊन शहरात दहशत माजवीत असल्याच्या घटना घडत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी पोलिस काय उपाययोजना करीत आहेत, या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर पोलिस आयुक्त रितेश कुमार म्हणाले, ‘शहरातील वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक यांची बैठक शुक्रवारी घेण्यात आली. या बैठकीत कोयते घेऊन दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे आदेश सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहेत. पोलिसांनी व्यूहरचना आखली असून, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) आणि झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एम.पी.डी.ए.) नुसार कारवाई सुरू आहे.’

आंबेगाव परिसरातील सिंहगड महाविद्यालयाजवळ खाऊ गल्लीत कोयते घेऊन दहशत पसरविण्याची घटना नुकतीच घडली. त्यावेळी पोलिसांनी या गुन्हेगारांना पाठलाग करून बेदम चोप दिला होता. परंतु त्यानंतरही शहरात अशा घटना सुरूच आहेत. या संदर्भात पोलिस आयुक्त रितेश कुमार म्हणाले, ‘शहरात दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांची यादी तयार करण्यात येत आहे. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेश सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहेत. अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचाही सहभाग आहे. त्यांच्यावर कारवाई करताना कायद्यातील तरतुदींचा आधार घेण्यात येणार आहे. त्यांचे समुपदेशन करण्यासाठी विशेष कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत याचे परिणाम दिसून येतील.’



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply