पुणे : कसबा पोटनिवडणूक बंदोबस्तात गुन्हे शाखेने पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला पकडले

कसबा मतदार संघातील पोटनिवडणुकीतील बंदोबस्तात गुन्हे शाखेने देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला पकडले. घोरपडे पेठेत ही कारवाई करण्यात आली. आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले. दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगल्याचे आरोपीने चौकशीत पोलिसांना सांगितले अभिषेक दीपक हजारे (वय २१, रा. शिवसेना शाखेजवळ, जनता वसाहत, पर्वती पायथा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

कसबा विधानसभा निवडणुकीसाठी पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पथक घोरपडे पेठेत गस्त घालत होते. त्यावेळी एक जण एकबोटे काॅलनी परिसरात थांबला असून त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून हजारेला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे पिस्तूल आढळून आले. पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले. दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.

पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, रमेश तापकीर, दत्ता सोनवणे, अनिकेत बाबर, राहुल मखरे, शशिकांत दरेकर, तुषार माळवदकर आदींनी ही कारवाई केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply